दुचाकी चोरटा एलसीबीच्या जाळ्यात, बुलेटसह ४ दुचाकी हस्तगत
महा पोलीस न्यूज । दि.३० ऑगस्ट २०२४ । जळगाव जिल्ह्यात अनेक मोटार सायकल चोरी होत आहेत. याबाबत गोपनीय माहिती काढून पुढील योग्य ती कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी स्थानिक गुन्हे शाखा पथकास दिले होते. पथकाने वरणगाव येथील एकाच्या मुसक्या आवळल्या आहेत. त्याच्याकडून चोरीच्या ४ दुचाकी हस्तगत करण्यात आल्या आहेत.
वरणगाव येथील जाबीर शहा भिकन शहा हा त्याचे साथीदारसह मोटारसायकल चोरी करून त्या कमी पैश्यामध्ये विक्री करीत असल्याची स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकास गोपनीय बातमी मिळाली होती. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांनी पोउपनिरी दत्तात्रय पोटे, सफौ विजयसिंग पाटील, हवालदार सुधाकर अंभोरे, अकरम शेख, लक्ष्मण पाटील, ईश्वर पाटील, रणजीत जाधव, जितेंद्र पाटील, भुषण पाटील, भारत पाटील, दिपक चौधरी यांचे पथक तयार करून तात्काळ रवाना केले होते.
पथक हे साधारण ३ दिवसापासून जाबीर शहा याचेवर पाळत ठेवून असतांना वरणगाव शहरातील तिरंगा चौकातून त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याची चौकशी केली असता त्याने मुक्ताईनगर, मलकापुर शहर, मध्य प्रदेशातील बऱ्हाणपुर जिल्ह्यातील खकनार येथील गुन्ह्यातील आणि आणखी एक दुचाकी काढून दिली आहे. आरोपीला पुढील चौकशीकामी मुक्ताईनगर पो.स्टे. चे ताब्यात देण्यात आले आहे.