मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांची लागणार वर्णी ?
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपचे धक्का तंत्र? 5 डिसेंबरला पंतप्रधानांच्या उपस्थितीत होणार शपथविधी
मुंबई (विशेष प्रतिनिधी):- महायुतीने राज्यातील सर्वाधिक जागा जिंकून सत्ता स्थापन करण्याचा दावा केला असला तरी मुख्यमंत्री पदाचे नाव आणि मंत्रिमंडळ खातेवाटप संदर्भात अजून तरी सस्पेन्स कायम असल्याचे चित्र दिसत असून मुख्यमंत्री कोण होणार, कुणाला किती मंत्रिपदे मिळणार, याबाबत तर्क वितर्क सुरू आहेत. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीच्या शपथ विधी सोहळ्याला पाच डिसेंबर रोजी उपस्थित राहणार आहेत.
गेले सहा दिवस निकाल लागून उलटले असले तरी अध्यापही मुख्यमंत्री पदाचे नाव अद्याप भाजप कडून जाहीर झाले नाही. मात्र राजकीय विश्लेषकांच्या मते काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सुरुवातीचे एक वर्ष मुख्यमंत्री म्हणून होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. तसेच गृहमंत्र्यासारखे खाते भाजप एकनाथ शिंदे यांच्याकडे द्यायला तयार नाही. याशिवाय लाडकी बहिणी योजना आणि विविध योजनांच्या माध्यमातून मुख्यमंत्री या नात्याने तसेच लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ असे एकनाथ शिंदे यांचा चेहरा महाराष्ट्रातील जनतेसमोर आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पाहता एक वर्षाचा कालावधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना दिल्यास त्याचा फायदा भाजप सह शिवसेना आणि राष्ट्रवादी किंबहुना महायुतीला होऊ शकतो. त्यामुळेच एकनाथ शिंदे हे मुख्य मंत्री बनण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे.
भाजपचे वरिष्ठ नेते असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा हे धक्का तंत्र वापरण्यात कुशल राजकारणी असल्याने आणि मुंबईसह इतर मोठ्या नगरातील महापालिका निवडणूक आणि जिल्हा परिषद निवडणूक डोळ्या समोर ठेवून एकनाथ शिंदे यांना सुरुवातीचा एक वर्षाचा कालावधी मुख्यमंत्री करण्यास भाजपाला काही अडचण नसल्याचे दिसून येत आहे. यानंतर तीन वर्षाचा कालावधी देवेंद्र फडवणीस हे मुख्यमंत्री म्हणून पाहू शकतात त्यानंतर अजित पवार हे उर्वरित काळ मुख्यमंत्री होण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. दरम्यान एकनाथ शिंदे हे दिल्लीतून परतल्यानंतर थेट आपल्या गावी सातारा येथे गेल्याने महायुतीची मुख्यमंत्री चे नाव आणि मंत्रिमंडळ घोषणा याबाबत महत्त्वाची बैठक रद्द करण्यात आली होती.
दोन डिसेंबर रोजी दुपारी महायुतीच्या नेत्यांची बैठकीत विधिमंडळ गटनेत्याची निवड होऊन मुख्यमंत्री पदाचे नाव देखील जाहीर होणार असल्याची माहिती सूत्रांनी वर्तवली आहे.
मोदींच्या उपस्थितीत 5 डिसेंबरला शपथविधी
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथिविधीचा मुहूर्त अखेर निश्चित झाला आहे. ५ डिसेंबर रोजी पंतप्रधान मोदींच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडणार आहे.