भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची पारोळा नगरपरिषदेवर सत्ता; चंद्रकांत पाटील नगराध्यक्षपदी

भाजप-शिवसेना (शिंदे) युतीची पारोळा नगरपरिषदेवर सत्ता; चंद्रकांत पाटील नगराध्यक्षपदी
पारोळा (प्रतिनिधी) : पारोळा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी सकाळी १० वाजता तहसील कार्यालयात सुरू झाली. कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दुपारपर्यंत सर्व निकाल जाहीर झाले असून, भाजप-शिवसेना (शिंदे गट) युतीने एकूण २५ जागांपैकी २० जागा जिंकत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. यामुळे नगरपरिषदेवर युतीची सत्ता बिनविरोध प्रस्थापित झाली आहे.
निकालाचा तपशील :
भाजप : १३ जागा
शिवसेना (शिंदे गट) : ७ जागा
जनाधार विकास पार्टी : ३ जागा
अपक्ष : २ जागा
नगराध्यक्षपदाच्या थेट लोकनिवडणुकीत शिवसेना (शिंदे गट)चे उमेदवार चंद्रकांत पाटील यांनी दमदार विजय नोंदवला. त्यांना ९,४८६ मते मिळाली असून, निकटच्या प्रतिस्पर्ध्याला मोठ्या फरकाने मागे टाकत त्यांनी नगराध्यक्षपदावर विराजमान झाले.
निकाल घोषित होताच युतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. विजयी उमेदवारांचा फटाके फोडून व ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. आमदार अमोल पाटील यांनी नवनिर्वाचित नगराध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि सर्व नगरसेवकांचे अभिनंदन करत त्यांना शुभेच्छा दिल्या.
या यशामुळे पारोळा शहराच्या विकासकामांना नवे बळ मिळेल आणि युतीचा कारभार अधिक गतिमान व प्रभावी होईल, असा विश्वास कार्यकर्ते व नागरिक व्यक्त करत आहेत. आगामी काळात शहराच्या मूलभूत सुविधा आणि विकास योजनांना प्राधान्य मिळेल, अशी अपेक्षा आहे.






