जळगाव प्रभाग १३ मध्ये महायुतीचे शिलेदार जाहीर; बंडखोरांना जिल्हाध्यक्षांचा ‘अल्टिमेटम’

जळगाव प्रभाग १३ मध्ये महायुतीचे शिलेदार जाहीर; बंडखोरांना जिल्हाध्यक्षांचा ‘अल्टिमेटम
जळगाव: जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय घडामोडींना वेग आला असून, भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक प्रभाकर सूर्यवंशी यांनी प्रभाग क्रमांक १३ मधील महायुतीच्या अधिकृत उमेदवारांची घोषणा केली आहे. या घोषणेसोबतच त्यांनी पक्षादेश डावलून अपक्ष म्हणून मैदानात उतरलेल्या बंडखोर उमेदवारांना कडक शब्दांत इशारा दिला आहे. महायुतीच्या अधिकृत उमेदवारांविरुद्ध निवडणूक लढवणाऱ्यांनी आपली भूमिका स्पष्ट न केल्यास त्यांच्यावर कठोर कायदेशीर आणि संघटनात्मक कारवाई करण्याचा पवित्रा पक्षाने घेतला आहे.
प्रभाग क्रमांक १३ मध्ये भारतीय जनता पक्ष, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि रिपाइं या घटक पक्षांच्या महायुतीने आपले तगडे उमेदवार मैदानात उतरवले आहेत. जाहीर झालेल्या यादीनुसार, प्रभाग १३ ‘अ’ मधून भाजपचे नितीन प्रभाकर सपके, तर प्रभाग १३ ‘ब’ मधून भाजपच्याच सौ. सुरेखा नितीन तायडे निवडणूक लढवणार आहेत. विशेष म्हणजे, प्रभाग १३ ‘क’ मधून सौ. वैशाली अमित पाटील यांची आधीच बिनविरोध निवड झाल्याने महायुतीचे पारडे जड झाले आहे. प्रभाग १३ ‘ड’ या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रफुल्ल गुलाबराव देवकर महायुतीचे अधिकृत उमेदवार म्हणून रिंगणात आहेत.
उमेदवारी जाहीर करतानाच जिल्हाध्यक्ष सूर्यवंशी यांनी बंडखोरी करणाऱ्यांवर निशाणा साधला. काही इच्छुकांनी पक्षाच्या सूचनेला केराची टोपली दाखवत अपक्ष अर्ज दाखल केले आहेत. हे उमेदवार मतदारांची दिशाभूल करत असून स्वतःला भाजपचेच उमेदवार म्हणून भासवत असल्याचे पक्षाच्या निदर्शनास आले आहे. अशा बंडखोरांनी येत्या दोन दिवसांत आपली भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा पक्षाकडून त्यांच्यावर कडक कारवाईचा बडगा उगारला जाईल, असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे बजावण्यात आले आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासासाठी मतदारांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता केवळ कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ या चिन्हांवरच मतदान करावे, असे आवाहन महायुतीतर्फे करण्यात आले आहे. या अधिकृत उमेदवारांच्या घोषणेमुळे प्रभाग १३ मधील प्रचाराचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला असून, कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह संचारला आहे.






