जळगावात महायुतीचा ‘महाविजय’ शंखनाद; देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीत जनसागराचा विक्रमी प्रतिसाद!

जळगाव: जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज महायुतीने प्रचंड शक्तिप्रदर्शन करत विजयाचा निर्धार केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शहरात निघालेल्या ‘महाविजय रथयात्रेला जळगावकरांनी अभूतपूर्व प्रतिसाद दिला. दुपारी साडेचार वाजता शिवाजी पुतळ्यापासून सुरू झालेल्या या यात्रेत जनसागराचा ओघ लोटला होता.
नेत्यांची फौज आणि कार्यकर्त्यांचा उत्साह
या भव्य रोड शोमध्ये जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव पाटील, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह आमदार राजू मामा भोळे, मंगेश चव्हाण आणि स्थानिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. रथावर ७५ उमेदवारांसह स्वार झालेल्या मुख्यमंत्र्यांनी जनतेचे अभिवादन स्वीकारले.
असा राहिला रथयात्रेचा मार्ग
शिवाजी पुतळ्यापासून निघालेली ही रथयात्रा नेहरू चौक, लालबहादूर शास्त्री टॉवर, चित्रा चौक आणि गोलाणी मार्केट या मुख्य बाजारपेठेतून मार्गस्थ झाली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी आणि फुलांच्या वर्षावाने मुख्यमंत्र्यांचे स्वागत करण्यात आले. घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दणाणून गेला होता.
चोख पोलीस बंदोबस्त
हजारो नागरिकांच्या गर्दीमुळे जळगाव पोलिसांनी शहरात विशेष वाहतूक नियोजन आणि कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. या रॅलीमुळे महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये नवे चैतन्य संचारले असून, निवडणुकीच्या वातावरणात मोठी आघाडी घेतल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.






