जळगाव मनपा निवडणूक : मतदानापूर्वीच भाजपचा श्रीगणेशा; प्रभाग १२ ‘ब’ मधून उज्ज्वला बेंडाळे बिनविरोध

जळगाव मनपा निवडणूक : मतदानापूर्वीच भाजपचा श्रीगणेशा; प्रभाग १२ ‘ब’ मधून उज्ज्वला बेंडाळे बिनविरोध
जळगाव (प्रतिनिधी) : जळगाव महानगरपालिका निवडणुकीच्या प्रत्यक्ष मतदानापूर्वीच भारतीय जनता पक्षाने विजयाचे खाते उघडले असून, प्रभाग क्रमांक १२ ‘ब’ (ओबीसी महिला राखीव) मधून भाजपच्या उमेदवार उज्ज्वला बेंडाळे यांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. उमेदवारी अर्जांच्या छाननी प्रक्रियेत प्रतिस्पर्धी उमेदवारांचे अर्ज तांत्रिक कारणास्तव बाद झाल्याने बेंडाळे यांचा विजयाचा मार्ग सुकर झाला.
महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १ हजार ३८ अर्जांची बुधवारी निवडणूक प्रशासनाकडून छाननी करण्यात आली. प्रभाग १२ ‘ब’ मध्ये भाजपच्या उज्ज्वला बेंडाळे यांच्यासह वैशाली पाटील आणि भारती चोपडे अशा एकूण तीन महिला उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. मात्र, छाननीदरम्यान प्रतिस्पर्धी उमेदवारांच्या अर्जात गंभीर त्रुटी आढळून आल्या.
अशी झाली छाननी प्रक्रिया :
भारती चोपडे यांनी अर्जात आवश्यक माहिती अपूर्ण ठेवल्याने त्यांचा अर्ज निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी अवैध ठरवला. दुसरीकडे, वैशाली पाटील यांनी एकाच वेळी प्रभाग १२ मधील ‘ब’ गटासह इतर दोन प्रभागांतूनही दावेदारी केली होती. निवडणूक नियमानुसार एका उमेदवाराला केवळ एकाच प्रभागातून निवडणूक लढवता येते. या नियमाच्या आधारे त्यांनी सर्वप्रथम दाखल केलेला अर्ज वैध ठरवून उर्वरित अर्ज बाद करण्यात आले.
या तांत्रिक घडामोडींनंतर प्रभाग १२ ‘ब’ मध्ये उज्ज्वला बेंडाळे यांचा एकमेव अर्ज वैध राहिला. परिणामी, निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र कुवर यांनी बेंडाळे यांची बिनविरोध निवड जाहीर केली. प्रचाराचा धुराळा उडण्यापूर्वीच भाजपने शहरात पहिला झेंडा फडकवल्याने पक्षाच्या गोटात उत्साहाचे वातावरण असून, हा विजय कार्यकर्त्यांसाठी बुस्टर डोस मानला जात आहे.






