Politics

मोठी बातमी : भाजपची पहिली यादी आज जाहीर होणार?

महा पोलीस न्यूज | १ मार्च २०२४ | देशभरात सध्या आगामी लोकसभा निवडणुकीच्या घोषणेची वाट पाहिली जात आहे. १० ते १५ मार्च दरम्यान आचारसंहिता लागण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान, भाजपच्या दिग्गज नेत्यांची मेगा बैठक रात्री उशिरापर्यंत पार पडली असून आज लोकसभा उमेदवारांची पाहिली यादी जाहीर होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपने यंदा पहिल्यांदाच पारंपरिक पद्धतीसोबतच तंत्रज्ञानाचा देखील प्रभावी उपयोग केला आहे. ‘एनडीटीव्ही’ने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले आहे.

देशात मार्चच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात आचारसंहितेची घोषणा होण्याची शक्यता असल्याने सर्वच पक्ष कामाला लागले आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आगामी निवडणुकीच्या लढाईत पक्षाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी निश्चित असलेल्या उमेदवारांची निवड करण्यासाठी भाजपने नुकतेच बहुस्तरीय प्रक्रिया राबविली असून त्यात विद्यमान खासदारांकडून वेळोवेळी अहवाल देखील मागविण्यात आले आहेत. भाजपच्या अंतर्गत प्रक्रियेत सार्वजनिक अभिप्राय, अंतर्गत मूल्यांकन आणि उच्च-स्तरीय धोरणात्मक चर्चा यांचा समावेश आहे.

उमेदवार निश्चितीसाठी भाजपच्या दिग्गज नेत्यांची मॅरेथॉन बैठक रात्री उशिरा दिल्लीत पार पडली. बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभेच्या ५४३ जागांसाठीच्या उमेदवारांवर व्यापक चर्चा करण्यात आली. काल रात्री ११ च्या सुमारास सुरू झालेल्या आणि चार तास चाललेल्या या बैठकीत भाजपने २०१९ च्या निवडणुकीत अपयशी ठरलेल्या जागा काबीज करणे किंवा सुधारणे यावर प्राधान्याने चर्चा केली. भाजपने यंदा पारंपरिक पद्धतीसोबतच तंत्रज्ञानाचा देखील वापर तळागाळातील लोकांकडून अभिप्राय मिळविण्यासाठी केला आहे. भाजपच्या सर्व लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि सदस्यांना नमो ॲपचे अधिकाधिक डाऊनलोड करण्यास सांगत त्यावर मत मांडण्याचे सांगितले होते.

गेल्या दोन वर्षांत भाजपने सातत्याने आपल्या खासदारांकडून अभिप्राय मागवले आहेत. तसेच इतर माध्यमातून देखील खासदारांच्या कामगिरीचे मूल्यांकन करण्यात आले होते. निर्णय घेण्याची प्रक्रिया आणखी व्यापक करण्यासाठी भाजपने प्रत्येक संसदीय मतदारसंघातील सर्वसमावेशक अहवाल संकलित करण्यासाठी सर्वेक्षण संस्थांशी देखील संपर्क साधला होता. मंत्री आणि संघटनात्मक सूत्रांकडून गोळा केलेली माहिती नंतर राज्यस्तरीय निवडणूक समितीच्या बैठकीत एकत्रित केली गेली आणि अंतिम निवड प्रक्रियेचा पाया रचला गेला.

भाजपची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून इतर पक्षातून भाजपात येणाऱ्यांची संख्या वाढत आहे. भाजपकडून इतर पक्षातील उमेदवारांना आपल्याकडे आणण्यासाठी करण्यासाठी ठोस प्रयत्न केले जात आहेत. इतर पक्षातील दमदार नेत्यांची भाजपात एन्ट्री होत असल्याने सुमार कामगिरी असलेल्या किमान ६० ते ७० विद्यमान खासदारांचा नव्या चेहऱ्यांसाठी पत्ता कट होऊ शकतो अशी शक्यता आहे. महाराष्ट्रात देखील मोठे फेरबदल होण्याची शक्यता व्यक्त होत असून सर्व समावेशक आणि मोठा जनसंपर्क असलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. ‘अब की बार ४०० पार’ लक्ष गाठण्यासाठी भाजप काही विद्यमान मंत्र्यांना देखील लोकसभेच्या रिंगणात उतरवण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button