ब्रेकिंग : चोपड्यात गांजाची शेती पकडली, ९८० किलो गांजा जप्त

महा पोलीस न्यूज | १३ मार्च २०२४ | चोपडा शहरापासून तीस किमीवरील सातपुड्यातील मेलाणे गावात सव्वा एकर मक्याच्या शेतात आंतरपीक म्हणून लागवड केलेला ३९ लाख २० हजार रुपये किमतीचा ९८० किलो गांजा मंगळवारी पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. शेतमालक अर्जुन सुमाऱ्या पावरा (वसावे, वय ५०) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. दुपारी तीन वाजेपासून रात्री उशिरापर्यंत ही कारवाई सुरू होती.
सातपुडा पर्वताच्या कुशीत वसलेल्या मेलाणे गावात सव्वा एकर शेतात गांजाची लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचत दुपारी शेतात छापा टाकला असता त्यात त्यांना मक्याच्या सव्वा एकर क्षेत्रात गांजाची लागवड केलेली आढळून आली आहे. चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक कावेरी कमालकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक शेषराव नितनवरे, हवालदार संदीप पाटील, प्रवीण मांडोळे, स्थानिक गुन्हे शाखेचे युनूस शेख, नंदलाल पाटील, दर्शन ढाकणे यांच्या पथकाने गांजा जप्त केला.
गांजाची कापणी करून त्याची रात्री उशिरापर्यंत मोजणी करण्यात आली. रात्री दहा वाजता गांजा भरलेला ट्रक चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्यात जमा करण्यात आला आहे. दुपारी सुरू झालेली कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. याप्रकरणी शेतमालक अर्जुन सुमाऱ्या पावरा (वसावे, वय ५०) या संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. जळगाव जिल्ह्यातील गांजाची ही मोठी कारवाई मानली जात आहे.