खळबळजनक : जळगावच्या तरुणाची मुक्ताईनगरात हत्त्या, हातपाय बांधून नदीत फेकले
महा पोलीस न्यूज । १९ जुलै २०२४ । जळगाव शहरातील एका २५ वर्षीय तरुणाचा उधारीच्या पैशावरून त्याच्याच मित्रांनी मुक्ताईनगर शिवारातील डोलारखेडा भागात खून केल्याची घटना उघडकीस आली आहे. आरोपींनी तरुणाचा मृतदेह हातपाय बांधून नदीपात्रात फेकल्याचे समोर आल्यानंतर शोधमोहीम सुरु करण्यात आली. शुक्रवार दि.१९ जुलै तब्बल ९ तासांनी त्याचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. नितीन साहेबराव पाटील (वय २५, रा. कला वसंत नगर, असोदा रोड, जळगाव) असे मयत तरुणाचे नाव आहे.
दिल्ली येथे अप्रेंटीशीप करीत असलेला नितीन साहेबराव पाटील हा तरुण कलावसंत नगर असोदा रोड येथे आई, वडील, मोठा भाऊ यांच्यासह राहत होता. काही दिवसांपूर्वीच तो दिल्ली येथून रेल्वेत अप्रेंटीशीप करून तो जळगावात परतला होता. नितीनचे वडील हे हार्डवेअरच्या दुकानात मजुरी काम करून तर आई भाजीपाला विक्री करुन परिवाराचा उदरनिर्वाह भागवत होते.
मिळालेल्या माहितीनुसार, नितीन पाटील याच्याकडून मुक्ताईनगर येथील मित्राने १ लाख रुपये उसनवारीने घेतले होते. उसनवारीने घेतलेले पैसे नितीन पाटील हा सारखा त्याच्या मित्राला मागत असल्याने ते त्याच्या मित्राला आवडत नव्हते. संशयित आरोपी याने गुरुवारी दि.१८ जुलै रोजी “इकडे ये पैसे घेऊन जा.. आपल्याला एका कार्यक्रमाला जायचे आहे, तिकडे आपण जाऊ” असे सांगून संशयित आरोपीने नितीन पाटीलला बोलावून घेतले. त्यानंतर डोलारखेडा शिवारात नेऊन तेथे काही मित्रांच्या मदतीने त्याचा खून करून मृतदेह हात पाय बांधून पूर्णा नदी पात्रात फेकून दिला.
दरम्यान, नितीनचा संपर्क होत नसल्याने त्याचे कुटुंबिय हे मुक्ताईनगर पोलीस स्थानकात आले. याप्रसंगी नितीन पाटील यांच्यासोबत असणारा एक युवक देखील पोलीस स्थानकात आला. या तरूणाने काही जणांनी नितीनला कुंड गावाजवळच्या जंगलात मारून त्याचा मृतदेह पुर्णा नदीच्या पात्रात टाकून दिल्याचे सांगितले. पोलिसांनी याप्रकरणी माहिती देणार्या तरूणाला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणात अन्य आरोपींचा सहभाग असून त्याचा तपास देखील सुरू आहे.
मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला ही माहिती कळताच त्यांनी शुक्रवारी पहाटे २ वाजेपासून पूर्णा नदीपात्रात मृतदेहाचा शोध घ्यायला सुरुवात केली. तब्बल ९ तासांनी त्यांना मयत नितीन पाटील यांचा मृतदेह हात पाय बांधलेल्या अवस्थेत सापडला. मृतदेह मुक्ताईनगर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आला. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मयत घोषित केले. घटने प्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्टेशनला खुनाचा गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे.
दरम्यान, खूनाच्या घटनेमुळे मुक्ताईनगर हादरले असून नितीन पाटीलच्या कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. नितीनचा मित्रपरिवार मोठा असून घटनेची माहिती कळताच त्यांनी मुक्ताईनगर येथे धाव घेतली.