ब्रेकिंग : तलाठीला लाच घेताना रंगेहाथ पकडले, जळगाव एसीबीची कारवाई

महा पोलीस न्यूज । दि.७ जानेवारी २०२४ । जळगाव येथून जवळच असलेल्या कुसुंबा येथे एका तलाठीने नागरिकांकडून ७/१२ उतारा आणि स्लॅब रजिस्टरमध्ये नाव समाविष्ट करण्यासाठी लाच मागितली होती. या प्रकरणी एका नागरिकाने लाप्रवि जळगाव येथे तक्रार दिल्यानंतर पथकाने सापळा रचून ३ हजार रुपये लाच घेताना रंगेहाथ पकडले.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपले आणि आपल्या भावाचे नाव ७/१२ उताऱ्यावर आणि स्लॅब रजिस्टरवर नोंदवण्यासाठी कुसुंबा तलाठीकडे अर्ज दिला होता. तलाठी नितीन शेषराव भोई यांनी या बदल्यात ५ हजार रुपये लाचेची मागणी केली. त्यानंतर तडजोड अंती ३ हजार रुपयांवर समझोता झाला. तक्रारदाराला ही बाब मान्य नसल्याने त्याने लाप्रवि जळगाव येथे तक्रार दिली.
लाप्रविच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत तलाठीच्या कार्यालयात सापळा उभारला. पथकाने तलाठ्याला ३ हजार रुपये घेण्याचा प्रयत्न करत होता तेव्हा त्याला रंगेहाथ पकडण्यात आले. संपूर्ण कामगिरी एसीबीचे उपअधीक्षक योगेश ठाकूर, पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक उपनिरीक्षक सुरेश पाटील, बाळू मराठे, अमोल सूर्यवंशी यांनी केली आहे.
तक्रार कशी करावी?
तुम्हाला कोणत्याही सरकारी अधिकाऱ्याकडून लाचेची मागणी होत असल्यास तुम्ही खालील पत्त्यावर संपर्क करू शकता. लाप्रवि जळगाव, अल्पबचत भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, जळगाव दूरध्वनी क्रं. 0257-2235477, मोबा.क्रं. 9702433131, टोल फ्रि क्रं. 1064.