ब्रेकिंग : नववर्षाच्या सुरुवातीलाच दहशत, मामा-भाचा पिस्तुल आणि तलवारीसह गजाआड!

महा पोलीस न्यूज । दि.२ जानेवारी २०२५ । नवीन वर्षाच्या पहिल्या रात्री जळगाव शहरात शनिपेठ पोलीस ठाण्याच्या पथकाने एक महत्वाची कारवाई करत मामा-भाच्यांना गावठी पिस्तुल आणि धारदार तलवारसह अटक केली. शाम साहेबराव सपकाळे (वय ३०, रा. असोदा रोड) आणि विशाल उर्फ सोनू धनराज सोनवणे (वय २०, रा. असोदा रोड) अशी संशयितांची नावे आहेत.
शनिपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांचे गुन्हे शोध पथक शहरातील पेट्रोलिंग करीत होते. या पेट्रोलिंग दरम्यान पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांना २ इसम धारदार शस्त्रे घेऊन दहशत माजवत असल्याची माहिती मिळाली. निरीक्षकांनी लागलीच पथक रवाना केले.
दि.१ जानेवारी रोजी मध्यरात्री अडीच वाजता रेकॉर्डवरील संशयित शाम साहेबराव सपकाळे (वय ३०, रा.असोदा रोड) गावठी पिस्तुल घेऊन दहशत माजवताना दिसून आला. पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडले आणि त्याच्याकडून गावठी पिस्तुल आणि दोन जीवंत काडतूस जप्त केले. शाम सपकाळे याची अधिक चौकशी सुरू असताना, त्याचा भाचा विशाल उर्फ सोनू धनराज सोनवणे (वय २०, रा.असोदा रोड) हाही मिळून आला. त्याच्या कडेही एक धारदार तलवार जप्त करण्यात आली.
दोघांविरुद्ध शनिपेठ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक योगेश ढिकले हे तपास करत आहेत. संशयिताना न्यायालयात हजर केले असता त्यांना २ दिवसाची पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे यांचे पथकातील हवालदार गिरीश पाटील, अनिल कांबळे, विकी इंगळे, गजानन वाघ, पराग दुसाने, वाहन चालक शाम काळे यांनी केलेली आहे.