ब्रेकिंग : जळगाव जिल्ह्यात पुन्हा तरुणाचा खून, दोघे जखमी
महा पोलीस न्यूज | ४ जून २०२४ | जळगाव जिल्ह्यात खुनांची मालिका सुरूच असून सलग दुसऱ्या दिवशी एका तरुणाचा खून झाला आहे. भुसावळ तालुक्यातील वरणगाव येथील मराठे पान मंदिर परिसरात दोन गटात दुचाकी लावण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून एका गटाने चॉपरने प्राणघातक हल्ला केला. यात एका तरुणाचा मृत्यू झाला असून दोन जण जबर जखमी झाले आहेत. सय्यद आरिफ सय्यद समद अली (वय २८, रा. वरणगाव ता. भुसावळ) असे मयत तरुणाचे नाव आहे.
वरणगाव शहरात सय्यद आरिफ सय्यद समद अली हा तरुण गावात आई, वडील, पत्नी यांच्यासह राहतो. कांदे-बटाट्याचा व्यवसाय करून तो परिवाराचा उदरनिर्वाह करीत होता. गावातीलच काही जणांसोबत त्याचे जुने वाद होते. मंगळवारी दि.४ जून रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास मराठे पान मंदिराच्या आवारात त्याने त्याची दुचाकी लावली होती. त्याचवेळी जुना वाद असलेल्या व्यक्तीने देखील त्याच्या दुचाकीजवळ दुचाकी लावली.
दुचाकी लावण्यावरून दोघांमध्ये शाब्दिक वाद झाले. वाद विकोपाला गेल्यानंतर एकाने तरुणाने चॉपरने तिघांवर प्राणघातक हल्ला केला. यात सय्यद आरिफ याच्या छातीत चॉपर घुसल्याने तो खाली कोसळला. तर आकिब अली कमर अली (वय २२) याच्या गळ्यावर, उजव्या हातावर व मुश्ताक अली सय्यद (वय ५०, दोन्ही रा. वरणगाव) यांच्या डोक्यावर वार झाले आहेत. दोघेही जबर जखमी झाले आहेत. घटनेनंतर तिघांना डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र सय्यद आरिफ याला मयत घोषित करण्यात आले. तर आकिब व मुश्ताक अली यांच्यावर उपचार सुरु आहेत.
मयत आरिफ याचा मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. घटनेचा तपास वरणगाव पोलीस स्टेशनचे सपोनि भरत चौधरी व त्यांचे सहकारी करीत आहेत. पोलीस संशयितांच्या मागावर असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी देखील घटनास्थळी भेट दिली आहे.