Accident | कासोदाजवळ एसटी बसला उलटली; एकाचा मृत्यू, ४० प्रवासी जखमी

महा पोलीस न्यूज । नितीन ठक्कर । एरंडोल बस आगाराची एक बस (क्रमांक MH 20 E 4302) भडगावहून एरंडोलकडे येत असताना भीषण अपघाताची शिकार झाली. एरंडोलपासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर अंजनी धरणाजवळ ही बस रस्त्यालगतच्या १५ ते २० फूट खोल नाल्यात कोसळली. या दुर्दैवी घटनेत एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला असून, सुमारे ३५ ते ४० प्रवासी जखमी झाले आहेत.
बस खोल नाल्यात पडल्यामुळे प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. स्थानिक नागरिक आणि मदतकार्य करणाऱ्यांनी बसच्या मागील आणि पुढील काचा तोडून तसेच खिडक्यांमधून जखमी प्रवाशांना बाहेर काढले. या घटनेमुळे एरंडोल-येवला राज्य मार्गावरील वाहतूक काही काळासाठी थांबवण्यात आली होती.
स्थानिक नागरिकांच्या मदतीने सर्व जखमींना तातडीने ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी जळगाव येथे हलवण्यात आले आहे, तर काही जखमींना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नेते अमित पाटील, राजेंद्र पाटील, मनोज पाटील, संजय महाजन यांनी घटनास्थळी धाव घेऊन मदतकार्यात सहभाग घेतला. एरंडोल पोलीस स्टेशनचे निरीक्षक निलेश गायकवाड यांनीही आपल्या टीमसह तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले.
अपघाताची बातमी गावात पसरताच जखमींच्या नातेवाइकांनी ग्रामीण रुग्णालयात मोठी गर्दी केली. आरोग्य अधिकारी कैलास पाटील आणि मुकेश चौधरी यांनी तातडीने जखमींवर उपचार सुरू केले.