चाळीसगावात ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात कडक कारवाई; दोन दिवसांत २४ गुन्हे, १.०७ लाखांचा दंड

चाळीसगावात ड्रंक अँड ड्राईव्हविरोधात कडक कारवाई; दोन दिवसांत २४ गुन्हे, १.०७ लाखांचा दंड
चाळीसगाव (प्रतिनिधी) : नववर्षाच्या पार्श्वभूमीवर शहर वाहतूक शाखा, चाळीसगाव यांच्याकडून दि. ३० व ३१ डिसेंबर रोजी विशेष तपास मोहीम राबविण्यात आली. या दोन दिवसांत दारू पिऊन वाहन चालवणाऱ्या (ड्रंक अँड ड्राईव्ह) एकूण २४ वाहनधारकांवर कारवाई करण्यात आली आहे. तसेच मोटार वाहन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या १९२ वाहनचालकांवर विविध कलमांखाली गुन्हे दाखल करून एकूण १ लाख ७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
या विशेष मोहिमेअंतर्गत शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, महाराणा प्रताप चौक, खरजई नाका आदी प्रमुख ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली होती. यासोबतच संपूर्ण शहरात वाहन तपासणीसह पेट्रोलिंगही करण्यात आली. या दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करत शहरातील वाहतूक सुरक्षिततेवर भर देण्यात आला.वाहतूक नियमांचे पालन करावे, मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, असे आवाहन शहर वाहतूक शाखेकडून करण्यात आले आहे.






