चाळीसगावचा विकास हा भाषणात नव्हे तर कृतीत दिसला पाहिजे -राष्ट्रीय जनमंच पक्ष

चाळीसगावचा विकास हा भाषणात नव्हे तर कृतीत दिसला पाहिजे -राष्ट्रीय जनमंच पक्ष
चाळीसगाव प्रतिनिधी नगरपालिकेच्या निवडणुकीचा रणसंग्राम तापू लागला असताना, आमदार मंगेश चव्हाण यांनी प्रभाग क्रमांक १, २ आणि ९ मध्ये विकासाच्या विविध योजना सांगण्यासाठी घेतलेल्या सभेवर राष्ट्रीय जनमंच पक्षाने तीव्र प्रतिक्रिया नोंदवली आहे. सभेत आमदारांनी “आपण विकास करू” असे आश्वासन दिले असले तरी, “भाजपच्या कार्यकाळातही हाच प्रभाग विकासापासून वंचित राहिला,” असा प्रश्न जनमंच पक्षाने उपस्थित केला आहे.
पक्षाने जाहीर केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मागील नगरपरिषदेमध्ये भारतीय जनता पक्षाचाच कारभार होता. नगराध्यक्ष पद महिला राखीव असताना त्या याच प्रभागातील होत्या, तसेच या प्रभागातून भाजपचे तीन नगरसेवक निवडून आले होते. “मग इतक्या वर्षांत हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न का सुटला नाही?” असा थेट सवाल जनमंच पक्षाने विचारला आहे.
हिंदू स्मशानभूमीचा प्रश्न कायमच प्रलंबित:
रेल्वेच्या पलीकडील भागात आजही हिंदू स्मशानभूमी नसल्याने नागरिकांना चार किलोमीटर अंतरावर अंत्यसंस्कारासाठी जावे लागते. “हिंदुत्वाचा झेंडा हातात घेणाऱ्या पक्षाने हिंदू समाजाच्या या धार्मिक गरजेकडे दुर्लक्ष का केले?” असा टोला जनमंच पक्षाने लगावला. पक्षाने स्पष्ट केले की, या विषयावर त्यांनी पूर्वीही सातत्याने आवाज उठवला आहे आणि पुढेही लढा सुरू ठेवला जाईल.
मूलभूत सुविधांचा अभाव ठळक:
या भागात आजही रस्ते, गटारे, सार्वजनिक शौचालये आणि मुतारींचा अभाव आहे. “जिथे सत्ताधारी पक्षाचे तीन नगरसेवक होते, त्या भागाचा हा दारुण चेहरा जनतेसमोर आहे,” असे जनमंचचे म्हणणे आहे. त्यांनी टीका केली की, जनतेला केवळ सभा आणि आश्वासने मिळाली — पण प्रत्यक्षात विकास शून्य राहिला.
राष्ट्रीय जनमंच पक्षाने आवाहन केले की, “चाळीसगावचा विकास हा भाषणात नव्हे तर कृतीत दिसला पाहिजे. जनतेच्या प्रश्नांना उत्तर देणे हेच खऱ्या नेतृत्वाचे लक्षण आहे,” असे सांगत पक्षाने नागरिकांना विचारपूर्वक मत देण्याचे आवाहन केले आहे.






