शेतकऱ्यांच्या भाजीपाल्याला कवडीमोल भाव; तर बाजारात चढ्या दराने विक्री

चाळीसगाव : चांगला पाऊस बरसल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात भाजीपाला लागवड केली आहे. मात्र, मेहनत करून पिकवलेल्या भाजीपाल्याला बाजारात कवडीमोल भाव मिळत आहे. परंतु, तोच भाजीपाला विक्रेत्यांकडून ग्राहकांना चार ते पाच पट महाग दराने विकला जात असल्याचे चित्र समोर आले आहे.
यामुळे लागवडीचा खर्चही परत मिळत नसल्याने अनेक शेतकऱ्यांवर उभ्या शेतातला भाजीपाला उपटून टाकण्याची वेळ आली आहे. शेतकरी नगदी मिळेल, संसाराला हातभार लागेल, या आशेने भाजीपाला लागवड करतात. परंतु व्यापाऱ्यांकडून भाजीपाला विकत घेताना ५ ते १० रुपये किलो इतकाच दर दिला जातो. डोणदिगर येथील एका शेतकऱ्याने २ महिने कष्ट करून मिरचीचे उत्पादन घेतले. परंतु मिरचीला योग्य भाव मिळाला नाही. अखेर खर्चही न निघाल्याने त्या शेतकऱ्याने शेतात नांगर फिरवून आपला संताप व्यक्त केला. दुसरीकडे हीच मिरची किरकोळ बाजारात ३० ते ४० रुपये किलो दराने विकली जात आहे.
सध्या शेतकऱ्यांकडून भेंडी १५ रुपये, काकडी १२ रुपये, वांगी २० रुपये, टोमॅटो १५ रुपये किलो या दराने विकत घेतली जात आहे. मात्र, किरकोळ बाजारात ग्राहकांना याच भाज्या अव्वाच्या सव्वा दराने विकत घ्याव्या लागत आहेत. शेतकऱ्यांना कवडीमोल भाव आणि ग्राहकांसाठी महागाई, अशी दुहेरी कात्री असल्याने शेतकरी जगेल तरी कसा? असा प्रश्न निर्माण झाला आहे






