चाळीसगाव नगरपरिषदेत “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” अभियानाला प्रारंभ

महा पोलीस न्यूज । भूषण शेटे । स्वच्छ भारत अभियान संचालक, गृहनिर्माण तथा शहरी कार्य मंत्रालय, भारत सरकार यांच्या निर्देशानुसार दिनांक 1 जुलै 2025 ते 31 जुलै 2025 या कालावधीत “सफाई अपनाओ, बिमारी भगाओ” हे अभियान राबवण्यात येत आहे. याअनुषंगाने चाळीसगाव नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी सौरभ जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपरिषद शाळा क्रमांक 16 येथे विद्यार्थ्यांसाठी स्वच्छतेविषयी जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
नगरपरिषद शाळा क्रमांक 16 येथे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांना स्वच्छतेचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. शहर समन्वयक करण चव्हाण यांनी अभियानातील सहा मंत्रांबाबत सविस्तर माहिती दिली. यावेळी स्वच्छता निरीक्षक अनिल गाढे, मुकादम प्रशांत जाधव आणि शाळेतील शिक्षक उपस्थित होते. विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेत स्वच्छतेचा संदेश पुढे नेण्याचा संकल्प केला. या अभियानाचा मुख्य उद्देश नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजवून साथीजन्य आणि जलजन्य आजारांना प्रतिबंध करणे आहे.
यासाठी खालील सहा प्रमुख मंत्रांवर आधारित उपाययोजना राबवल्या जाणार :
स्वच्छ हात : झोपडपट्टी, शाळा आणि इतर महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये हात धुण्याच्या पद्धतींना प्रोत्साहन देऊन स्वच्छतेची जागरूकता वाढवणे आणि रोगांचा प्रसार रोखणे.
स्वच्छ घरे : घरोघरी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी जागरूकता मोहिमा आणि देखरेखीवर भर देणे, ज्यामुळे साथीजन्य आणि जलजन्य आजारांना आळा बसेल.
स्वच्छ परिसर : नागरिकांना स्वच्छ आणि निरोगी परिसर राखण्यासाठी प्रोत्साहित करणे. यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था लक्ष्यित वर्तनात्मक सूचना देतील.
स्वच्छ शौचालये : सामुदायिक आणि सार्वजनिक शौचालयांची नियमित स्वच्छता मोहीम राबवणे. शौचालय वापरकर्त्यांच्या वर्तनात सुधारणा करण्यासाठी विशेष सूचना देण्यात येणार.
स्वच्छ नाले आणि जलसाठे : तलाव, नद्या यासारख्या जलस्रोतांमध्ये कचरा टाकण्यावर निर्बंध घालणे. पावसाळ्यात नाले आणि जलसाठ्यांची नियमित देखभाल आणि स्वच्छतेसाठी विशेष “कार्य दल” स्थापन करून डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया यासारख्या रोगांना प्रतिबंध करणे.
स्वच्छ सार्वजनिक जागा : बाजारपेठा, फळे-भाजीपाला मंडई, खाऊ गल्ली, ड्रेनेज, नाले आणि पाणवठ्यांसारख्या गर्दीच्या आणि असुरक्षित ठिकाणी कचरा संकलन आणि वाहतूक कार्यक्षम करणे. दुर्गंधी, गळती, उंदीरांचा प्रादुर्भाव आणि मृत प्राण्यांचे अवशेष टाकण्यापासून रोखण्यासाठी विशेष लक्ष देणे.
चाळीसगाव शहराला स्वच्छ आणि निरोगी बनवणार
चाळीसगाव नगरपरिषदेने या अभियानाला व्यापक स्वरूप देण्याचे नियोजन केले आहे. येत्या काळात शाळा, झोपडपट्टी आणि सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता मोहिमा तीव्र केल्या जाणार आहेत. तसेच, नागरिकांमध्ये स्वच्छतेची सवय रुजवण्यासाठी नियमित जनजागृती कार्यक्रम आणि कार्यशाळा आयोजित करण्यात येणार आहेत. हा उपक्रम चाळीसगाव शहराला स्वच्छ आणि निरोगी बनवण्याच्या दिशेने एक महत्त्वाचा टप्पा ठरेल, असा विश्वास मुख्याधिकारी सौरभ जोशी यांनी व्यक्त केला.