Special

‘नो चिंता’ वाढवणार रावेर मतदारसंघात भाजप-राष्ट्रवादीची ‘चिंता’

रावेर मतदार संघात चौधरी बंधूंची मते, भुमिका ठरणार निर्णायक

महा पोलीस न्यूज | चेतन वाणी | रावेर लोकसभा मतदार संघात निष्ठावान पदाधिकाऱ्यांना डावलत भाजपतून आलेले उद्योजक श्रीराम पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. रावेर मतदार संघात भुसावळ येथील संतोष आणि अनिल चौधरी बंधूंचे मोठे वर्चस्व असून ते आता काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागून आहे. चौधरी बंधूंच्या पारड्यात असलेली हक्काची मते उमेदवाराला विजयश्री खेचून आणण्यात किंवा पराभवात मोठा वाटा ठेवतील हे नक्की आहे.

रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून माजी आ.संतोष चौधरी यांच्या नावाची चर्चा होती. पक्षप्रमुख शरद पवार यांच्याकडून देखील सुरुवातीला तसा सकारात्मक प्रतिसाद असल्याने चौधरी कामाला लागले होते. चौधरी यांचे भुसावळ शहरात जंगी स्वागत होताच जिल्हाध्यक्ष ऍड.रविंद्र भैय्या पाटील हे देखील उमेदवारीसाठी धावपळीला सक्रिय झाले. प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांचा देखील त्यांच्या नावाला पाठिंबा होता. त्यातच उद्योजक श्रीराम पाटील, तृप्ती बढे आणि विनोद सोनवणे यांचे नाव पुढे आले. अखेरीस रविंद्र पाटील, संतोष चौधरी आणि श्रीराम पाटील हीच नावे स्पर्धेत राहिली. दोन दिवसापूर्वी श्रीराम पाटील यांचा पक्षात प्रवेश करून घेतल्यानंतर आज उमेदवारी जाहीर करण्यात आली.

अनिल चौधरींच्या हक्काची ४५ हजार मते
माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्या प्रहार पक्षाचे अनिल चौधरी हे उत्तर महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये अनिल चौधरी यांनी सुरुवातीला एरंडोल – पारोळा विधानसभा मतदार संघातून निवडणूक लढविण्याची तयारी केली मात्र ऐनवेळी त्यांनी आपला मोर्चा यावल-रावेर विधानसभा मतदार संघाकडे वळवला. भाजपकडून उमेदवारीची प्रतिक्षा असताना उमेदवारी न मिळाल्याने अनिल चौधरी यांनी अपक्ष उमेदवारी लढवली आणि तब्बल २२.०५ टक्के म्हणजेच ४४ हजार ८४१ मते घेतली. काँग्रेसचे उमेदवार माजी आ.शिरीष चौधरी यांनी ७७ हजार ९४१ मते घेत विजय मिळवला तर भाजपचे उमेदवार तत्कालीन विद्यमान आ.हरिभाऊ जावळे यांना ६२ हजार ३३२ मते घेत पराभव पत्करावा लागला. अनिल चौधरी यांनी अपक्ष म्हणून आपल्या पारड्यात पाडलेल्या मतांमुळेच हरिभाऊ जावळे यांना पराभव पत्करावा लागला असे म्हटले जात होते.

संतोष चौधरींनी घेतली होती आजवरची सर्वोच्च ९२ हजार मते
भुसावळ नगरीचे शिल्पकार म्हणून ओळख असलेले माजी आ.संतोष चौधरी यांनी भुसावळ शहरात आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. अल्पसंख्याक असताना देखील त्यांनी नगरसेवक, उपनगराध्यक्ष, सभापती, नगराध्यक्ष ते आमदार अशी ओळख निर्माण केली आहे. संतोष चौधरी यांनी २००४ मध्ये भुसावळ विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेसकडून निवडणूक लढवत तब्बल ९२ हजार ४३० मते घेऊन विद्यमान आमदार दिलीप भोळे यांचा पराभव केला होता. शिवसेनेचे उमेदवार दिलीप भोळे यांना ६४ हजार ६६४ मते मिळाली होती. संतोष चौधरी यांनी भुसावळ विधानसभा मतदार संघातून आजवरची सर्वोच्च मते घेतली असून तो रेकॉर्ड आजही अबाधित आहे.

जनाधार आघाडीने गाठला मोठा आकडा
भुसावळ नगरपालिका निवडणुकीत २०१८ मध्ये चौधरी बंधुंकडून स्वतंत्र जनाधार आघाडी मैदानात उतरविण्यात आली होती. पालिका निवडणुका त्यांनी जनआधार आघाडी स्थापन करून स्वतंत्र गटाव्दारे लढविल्या होत्या. त्यांच्या गटाचे तब्बल १७ नगरसेवक निवडून आले होते. संतोष चौधरी यांचा मुलगा सचिन चौधरी नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत अवघ्या ३ हजार मतांनी पराभूत झाला होता. जनाधार आघाडीने आपले मोठे प्रस्थ नगरपालिकेत दाखवून दिले होते.

शेतकी संघाच्या निवडणुकीत सावकारेंना दे धक्का
भुसावळ तालुका शेतकी संघाच्या चेअरमनपदाच्या निवडणुकीत भाजपचे आमदार संजय सावकारे यांच्या सहकार पॅनलकडे बहुमत असतानाही एक मत फुटले. यामुळे भाजपला मोठा धक्का बसला होता. तेव्हा माजी आमदार संतोष चौधरी गटाचे पंढरीनाथ तुकाराम पाटील (कन्हाळा, ता.भुसावळ) हे चेअरमन तर गोविंदा तुकाराम ढोले (मनूर, ता.बोदवड) हे व्हा.चेअरमनपदी निवडून आले होते. तालुका शेतकी संघाच्या चुरशीच्या निवडणुकीत आमदार संजय सावकारे यांच्या सहकार गटाला आठ तर माजी आमदार संतोष चौधरी यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी पॅनलला सात जागा मिळाल्या होत्या.

पाच वर्षात वाढले चौधरी बंधूंचे बळ
२०१८ पासून चौधरी परिवारातील जवळपास सर्वच सदस्य राजकारणात आणि सामाजिक कार्यात सक्रिय झाले आहे. संतोष चौधरी फारसे प्रकाशझोतात येत नसले तरी त्यांचा मुलगा सचिन आणि इतर दोन्ही मुले नेहमी समाजाच्या संपर्कात असतात. अनिल चौधरी यांनी पाच वर्षात यावल – रावेर विधानसभा मतदार संघात आपले प्रस्थ निर्माण केले असून दांडगा जनसंपर्क आहे. तसेच मंत्री गिरीश महाजन यांच्या सानिध्यात त्यांनी मोठा काळ घालवला असल्याने जामनेर, नेरी, पहूर मतदार संघात देखील त्यांचे चांगले संबंध आहेत. अनिल चौधरींचा मुलगा विदेशात शिक्षण घेऊन आलेला असल्याने पडद्यामागे राहून तो उत्तमरीत्या नियोजन हाताळतो. एकंदरीत पाच – दहा वर्षापूर्वी संतोष चौधरी आणि अनिल चौधरी भावांच्या वाट्याला असलेला मतांचा दीड लाखांचा आकडा आज नक्कीच ३ लाखांच्या वर पोहचला आहे. रावेर लोकसभा मतदार संघात एखाद्या उमेदवाराच्या विजयात किंवा पराभवात या मतांचा मोठा वाटा असणार आहे. यंदा ते कुणाला सहकार्य करतात किंवा वेगळी वाट धरतात यावर निकालाचे पुढील चित्र अवलंबून असणार आहे.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button