बुद्धिबळ पटावर नवोदितांचा दबदबा! ; मानांकितांचा घाम काढत रंगतदार लढती

बुद्धिबळ पटावर नवोदितांचा दबदबा! ; मानांकितांचा घाम काढत रंगतदार लढती
जैन हिल्समधील राष्ट्रीय स्पर्धेत नवख्या खेळाडूंचा झंझावात; समिता पुलगावन आघाडीवर
जळगाव, दि. ५ (प्रतिनिधी) – जैन हिल्स, जळगाव येथे सुरू असलेल्या ३८व्या राष्ट्रीय बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत नवख्या खेळाडूंनी मानांकितांचा घाम काढत रंगतदार लढती साधल्या आहेत. सहाव्या फेरीअखेर वर्चस्व राखण्यासाठी अव्वल मानांकित खेळाडूंना मोठी झुंज द्यावी लागत आहे. ३९२ मुलं व १७७ मुली अशा एकूण ५६९ स्पर्धकांनी सहभाग घेतलेल्या या स्पर्धेत ४०० हून अधिक खेळाडू मानांकित असून पहिल्या ४० खेळाडूंमध्ये ४ गुणांसह चुरशीची घौडदौड सुरू आहे.
मुलांच्या गटात धक्कादायक निकालांची मालिका…
पाचव्या फेरीत अनेक अप्रतिक्षित निकाल नोंदवले गेले. पहिल्या टेबलवर महाराष्ट्राचा आरेन मेहता याला अद्वित अग्रवालने हरवत खळबळ उडवली. दुसऱ्या टेबलवर अविरत चौहानने क्षितीज प्रसादचा पराभव केला, तर राजस्थानच्या रिशान जैनवर दिल्लीच्या अरिहत कपिलने बाजी मारली. कर्नाटकच्या वेंकटानागा कार्तिक याला पांडुचेरीच्या राहुल राम कृष्णनने नमवले. बिहारचा देवांश केसरीही पश्चिम बंगालच्या नरेंद्र अग्रवालपुढे टिकू शकला नाही.
मुलींच्या गटात समिता पुलगावन आघाडीवर
मुलींच्या गटात सहाव्या फेरीअखेर तेलंगणाची समिता पुलगावन पाच गुणांसह आघाडीवर आहे. पाचव्या फेरीत केरळच्या दिनी बेजेस व तिरपूरच्या आराध्या दास यांच्यात बरोबरीचा अटितटीचा सामना झाला. दुसऱ्या टेबलवर समिताने तामिळनाडूच्या पुजाश्रीचा पराभव केला. तिसऱ्या टेबलवर झारखंडच्या दिशीता डे हिने तेलंगणाची अल्ला हिमा हिला हरवले.
पंचगण व व्यवस्थापनाचा कस लागतोय
कोलकात्याचे मुख्य पंच देवाशीष बरुआ यांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा होत आहे. त्यांना सहाय्य करताना गुजरातचे प्रशांत रावल, जळगावचे प्रविण ठाकरे, नागपूरचे स्वप्नील बनसोड, नाशिकचे मंगेश गंभीरे, मुंबईचे संदेश नागरनाईक, साताऱ्याचे शांतुल तापासे, पुण्याच्या जुईली कुलकर्णी यांच्यासह अनेक पंचांचा समावेश आहे.
अंबिका जैन यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन
स्पर्धेच्या चौथ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात गांधी रिसर्च फाउंडेशनच्या सीईओ अंबिका अथांग जैन यांनी खेळाडूंना संबोधित करत महात्मा गांधींच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले. “विजय-पराभवापेक्षा खेळात १०० टक्के योगदान द्या, सकारात्मक खेळातून व्यक्तिमत्त्व घडवा,” असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी खेळाडूंनी गांधी तीर्थाला भेट द्यावी असेही आवाहन त्यांनी केले.
धक्कादायक लढत : अद्वित अग्रवालचा पराभव
पहिल्या पटावर महाराष्ट्राचा अग्रमानांकित अद्वित अग्रवाल (एलो २२५१) पांढऱ्या सोंगट्यांसह दिल्लीच्या अरित कपिल (एलो २०५०) याच्याशी भिडला. सुरुवातीला पांढऱ्यांच्या बाजूने खेळ झुकल्याचे चित्र होते. पण काळ्या उंटाच्या आक्रमणात पांढऱ्याने हत्ती बलिदान देत हल्ला चढविला. मात्र एफ-४ वर चुकीची चाल केल्यामुळे अरितने संधी साधून वजिराच्या भागात दोन सैनिकांची सरशी घेत निर्णायक विजय मिळवला. ही लढत दिवसातील सर्वात मोठा धक्का ठरली.
स्पर्धा अधिकच रंगतदार होण्याची चिन्हे
या लढतींमुळे पुढील फेऱ्यांमध्ये अजूनच चुरस निर्माण होणार आहे. मानांकितांची प्रतिष्ठा आणि नवोदितांची जिद्द यामध्ये रंगणाऱ्या या बुद्धिबळ महायुद्धाचे यशस्वी आयोजन जैन हिल्सच्या सहकार्याने पार पडत आहे.