छत्रपती संभाजीनगरमध्ये भ्रष्टाचाराचा पर्दाफाश! निवासी उपजिल्हाधिकारी ५ लाखांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगरमध्ये भ्रष्टाचाराचा पर्दाफाश! निवासी उपजिल्हाधिकारी ५ लाखांची लाच घेताना ACBच्या जाळ्यात
छत्रपती संभाजीनगर l प्रतिनिधी छत्रपती संभाजीनगरमध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई करत प्रशासनातील मोठा भ्रष्टाचार उघडकीस आणला आहे. निवासी उपजिल्हाधिकारी विनोद खिरोळकर यांना तब्बल ५ लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. त्यांच्या सोबत अव्वल कारकून त्रिभुवन यांनाही अटक करण्यात आली असून, ही कारवाई प्रशासनातील भ्रष्ट साखळीचे गंभीर संकेत देणारी आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तक्रारदाराने आपल्या शेतजमिनीचे वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये रूपांतर करण्यासाठी निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला होता. या कामासाठी आधीच २३ लाख रुपये उकळल्यानंतरही अधिकारी खिरोळकर यांनी पुन्हा १८ लाखांची मागणी केली होती. त्यातील ५ लाख रुपये स्वीकारताना त्रिभुवन यांच्या माध्यमातून ही लाच स्वीकारली जात होती, त्याच वेळी ACBने सापळा रचून ही कारवाई केली.
या प्रकारामुळे संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. प्रशासनातील वरिष्ठ स्तरावर भ्रष्टाचार किती खोलवर रूजला आहे, याचे हे ठळक उदाहरण ठरत आहे. विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांत राज्यात लाचखोरीच्या घटनांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. ग्रामसेवक, तलाठी, तहसीलदार यांच्यापाठोपाठ आता निवासी उपजिल्हाधिकारीसारखा वरिष्ठ अधिकारीही ACBच्या जाळ्यात अडकला आहे.
या घटनेनंतर प्रशासनात खळबळ माजली असून, पुढील तपास ACBकडून सुरू आहे. लाचखोरीविरोधातील ही कारवाई इतर भ्रष्ट अधिकाऱ्यांसाठी धडा ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.