चोपडा व यावल तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून केळी लुट थांबवावी

चोपडा व यावल तालुक्यांचा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून केळी लुट थांबवावी
शेतकरी कृती समितीचे जिल्हाधिकाऱ्यांना साकडे
चोपडा (प्रतिनिधी) – चोपडा व यावल तालुक्यांचा दुष्काळग्रस्तांच्या यादीत प्रारंभी समावेश करून नंतर वगळण्यात आल्याच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली असून, या पार्श्वभूमीवर शेतकरी कृती समितीच्या प्रतिनिधींनी नव्या जिल्हाधिकारी श्री. रोहन घुगे यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात समितीने नमूद केले की, तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर पिकांचे नुकसान झाले आहे. सकाळी ८ वाजता पावसाचे मोजमाप घेऊन दुसऱ्या दिवशी पुन्हा मोजणी केल्याने तांत्रिक त्रुटींमुळे वास्तविक परिस्थितीचा अंदाज चुकीचा निघाला, आणि त्यामुळे शेतकऱ्यांचा घात झाला, अशी बाब जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली.
समितीच्या प्रतिनिधींनी सांगितले की, चोपडा तालुक्यातील जमीन रायचिकन (Heavy Black Cotton Soil) प्रकारातील असल्याने निचरा न होऊन सततच्या पावसामुळे पिके सडली, कापसाच्या बोंडाचे नुकसान झाले आणि सरकी पूर्णपणे खराब झाली आहे. या परिस्थितीत तालुक्याचा पुन्हा दुष्काळग्रस्त यादीत समावेश करून शेतकऱ्यांना मदत मिळावी, अशी मागणी करण्यात आली.
बैठकीदरम्यान केळी उत्पादकांच्या अडचणी आणि भावपडतीच्या कारणांवरही सविस्तर चर्चा झाली. जिल्हाधिकाऱ्यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद देत केळी उत्पादक शेतकरी, व्यापारी आणि बाजार समिती प्रतिनिधींची संयुक्त बैठक घेऊन योग्य तो मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
या वेळी जळगावचे आमदार राजूमामा भोळे उपस्थित होते. तसेच एस. बी. पाटील, प्रशांत पाटील, अजित पाटील आदी मान्यवर सहभागी झाले होते.






