नव्या पिढीचा आदर्श ठरलेला युवक : लासूर येथील १८ वर्षीय रोहन महाराजांची निस्वार्थ तीर्थसेवा

नव्या पिढीचा आदर्श ठरलेला युवक : लासूर येथील १८ वर्षीय रोहन महाराजांची निस्वार्थ तीर्थसेवा
चोपडा (प्रतिनिधी) :संगणकीय युगात मोबाईल, इंटरनेट आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वाढत्या प्रभावामुळे आजची तरुण पिढी अध्यात्म व सांप्रदायिक परंपरेपासून दूर जात असल्याचे चित्र असताना, चोपडा तालुक्यातील लासूर येथील १८ वर्षीय युवक मृंदगाचार्य ह.भ.प. रोहन महाराज यांनी लहान वयातच अध्यात्माची कास धरत समाजासमोर एक सकारात्मक आणि प्रेरणादायी आदर्श निर्माण केला आहे.
इयत्ता तिसरीपासूनच सांप्रदायिक पंथाशी नाळ जोडलेल्या रोहन महाराजांनी भक्तीभाव, शिस्त आणि साधनेच्या जोरावर आपला अध्यात्मिक प्रवास सुरू केला. अध्यात्माची तीव्र ओढ असल्याने त्यांनी नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर येथे जाऊन मृदुंग वादनाचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतले. आज त्यांच्या उत्कृष्ट मृदुंग वादनामुळे त्यांना जळगाव, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांतील किर्तन सप्ताह, एकदिवसीय किर्तन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांसाठी आवर्जून आमंत्रित केले जाते.
केवळ कीर्तनापुरतेच न थांबता, आदिशक्ती मुक्ताई तीर्थयात्रा परिवाराच्या माध्यमातून रोहन महाराजांनी “ना नफा ना तोटा” या तत्त्वावर तब्बल ५१ भाविक मातृशक्तींना अकरा दिवसांची तीर्थयात्रा यशस्वीपणे घडवून आणली. विशेष म्हणजे लासूरसारख्या ग्रामीण भागातून इतक्या कमी वयात कोणतीही तीर्थयात्रा याआधी आयोजित झालेली नसताना, रोहन महाराजांनी ही जबाबदारी समर्थपणे पार पाडून सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
या तीर्थयात्रेचे नियोजन अत्यंत काटेकोर होते. वेळेवर चहा, नाश्ता व जेवणाची व्यवस्था, भाविकांसाठी उत्तम निवास व्यवस्था, प्रत्येक तीर्थक्षेत्री सविस्तर माहिती देणारे मार्गदर्शक, भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य तसेच तीर्थक्षेत्रानुसार धार्मिक विधींसाठी आवश्यक सहकार्य करण्यात आले. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश व बिहार या राज्यांतून प्रवास करताना भाविकांना कोणताही त्रास न होता यात्रा सुखरूप आणि आनंददायी ठरली.
या यात्रेतील एक भाविक मातृशक्ती प्रतिभा पवार (रा. चाळीसगाव) यांनीही रोहन महाराजांच्या नियोजनाचे विशेष कौतुक केले आहे. तसेच लहान वयातच श्रीराम भजनी मंडळात विणेकरी ह.भ.प. विश्वास महाराज यांचे मार्गदर्शन व प्रोत्साहन रोहन महाराजांना मृदुंग वादनासाठी लाभले.
अध्यात्म, सेवा आणि सांप्रदायिक परंपरेचे जतन करणाऱ्या ह.भ.प. रोहन महाराजांच्या या निस्वार्थ कार्याचे सर्वत्र कौतुक होत असून, ते आजच्या तरुण पिढीसाठी खऱ्या अर्थाने प्रेरणास्थान ठरत आहेत.





