चोरीच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; पोलीस उपनिरीक्षकासह चौघांना अटक
एलसीबी आणि चोपडा पोलिसांची कारवाई

चोरीच्या तयारीत असलेली टोळी जेरबंद; पोलीस उपनिरीक्षकासह चौघांना अटक
एलसीबी आणि चोपडा पोलिसांची कारवाई
चोपडा, ;- चोपडा शहरातील बसस्थानक परिसरात चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखा (एलसीबी) आणि चोपडा पोलिसांनी संयुक्त कारवाईत पर्दाफाश केला. या टोळीत जालना पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकाचा समावेश असल्याचे उघड झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. बुधवारी (१६ एप्रिल) रचलेल्या सापळ्यात पोलिसांनी चार जणांना अटक केली.
गुप्त माहितीच्या आधारे चोपडा पोलिसांनी बसस्थानक परिसरात सापळा रचला. संशयित एमएच ४३ २९२८ क्रमांकाच्या वाहनातून पळून जाण्याच्या प्रयत्नात असताना धरणगाव नाक्यावर त्यांना अटक करण्यात आले. अटक करण्यात आलेल्यांमध्ये प्रल्हाद पिराजी मालटे (वय ५८, रा. सदर बाजार, जालना) – पोलीस उपनिरीक्षक, जालना , श्रीकांत भिमराव बघे (वय २७, रा. गोपालनगर, खामगाव) , अंबादास सुखदेव साळगावकर (वय ४३, रा. माना, ता. मूर्तिजापूर, जि. अकोला) , रउफ अहमद शेख (वय ४८, रा. महाळस, जि. बीड) यांचा समावेश आहे.
यापैकी अंबादास साळगावकरवर यापूर्वी २७ चोरीचे गुन्हे दाखल असून, या टोळीच्या माध्यमातून आणखी काही गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.
पोलीस उपनिरीक्षकाचा सहभाग
सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, प्रल्हाद मालटे हे जालना पोलीस दलातील कार्यरत पोलीस उपनिरीक्षक असून, ते तीन महिन्यांत सेवानिवृत्त होणार होते. जालना बसस्थानक परिसरात ड्युटीवर असताना त्यांचा संशयित आरोपींशी संपर्क आला आणि त्यांनी या चोरीच्या टोळीत सहभाग घेतला. या कृत्यामुळे पोलीस दलाच्या प्रतिमेला मोठा धक्का बसला आहे.
या टोळीने बसस्थानक परिसरातील गर्दीचा फायदा घेऊन प्रवाशांचे दागिने आणि रोख रक्कम चोरण्याचा कट रचला होता. यापूर्वीच्या काही चोरीच्या घटनांवरून पोलिसांना या टोळीची कुणकुण लागली होती. त्यानुसार सापळा रचून टोळीवर नजर ठेवण्यात आली आणि अखेर त्यांना अटक करण्यात यश आले.
ही कारवाई चोपडा पोलीस निरीक्षक मधुकर साळवे आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोउनि गणेश वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पथकात पोउनि जितेंद्र वल्टे, पोहेकॉ विलेश सोनवणे, दिपक माळी, रवींद्र पाटील आणि पोना हेमंत पाटील यांचा समावेश होता.