Politics

जळगाव भाजपात निष्ठावंतांना गाजर!

महा पोलीस न्यूज | १७ फेब्रुवारी २०२४ | जळगाव जिल्ह्यात भाजप दिवसेंदिवस मजबूत होत असताना गटबाजी देखील वाढू लागली असल्याचे चित्र आहे. विद्यमान आमदार विरुद्ध एक गट अगोदरच सक्रिय असल्याने त्याचा परिणाम इतर आघाड्यांमध्ये देखील जाणवू लागला आहे. गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलेल्या भाजयुमो कार्यकारिणीत जुन्या निष्ठावान आणि मर्जीतल्या युवकांचा समावेश न केल्याने अनेकांची नाराजी वाढली आहे. भाजप कार्यालयात ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये यावरून वाद झाल्याची चर्चा सुरू असून ही बाब पक्षश्रेष्ठींच्या कानावर देखील गेल्याचे समजते.

एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला जळगाव जिल्हा आता भाजपचा गड झाला आहे. संकटमोचक मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या नेतृत्वात पक्षाला अधिक बळ मिळत आहे. राज्यात भाजपात इनकमिंग सुरू असताना जळगाव जिल्ह्यात देखील इनकमिंग सुरू झाले आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य माजी खा.उल्हास पाटील, डॉ.केतकी पाटील, उद्योजक श्रीराम पाटील, संजय गरूड यांनी भाजपात प्रवेश केला आहे. जिल्ह्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आणि वजनदार असलेले सर्व पदाधिकारी आहेत. एकीकडे भाजप इतरांच्या येण्याने मजबूत होत असताना दुसरीकडे अंतर्गत गटबाजीमुळे भाजपला धक्का बसण्याची शक्यता आहे. राज्याच्या राजकारणात व्यस्त असलेल्या मंत्री ना.गिरीश महाजन यांना त्याची प्रचिती अगोदरच आलेली आहे. मनपात भाजपकडून निवडून आलेल्या नगरसेवकांनी शिवसेनेचा महापौर केला तेव्हाच महाजनांना तो पहिला धक्का होता.

मनपा महापौर निवडीपासून भाजपतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. काही दिवसांपूर्वी आ.सुरेश भोळे आणि माजी उपमहापौर डॉ.आश्विन सोनवणे यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. मनपा हद्दीत होत असलेल्या विकासकामांच्या प्रसंगी देखील ती दिसून आली आहे. भाजपात सुरू असलेल्या या गटबाजीचा परिणाम ऐन निवडणुकीत दिसून येऊ शकतो. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या भाजपात विविध आघाड्यांच्या कार्यकारिणीची घोषणा करण्यात येत आहे. नुकतेच भाजयुमोची नवीन कार्यकारिणी देखील जाहीर करण्यात आली.

भाजयुमोच्या जिल्हाध्यक्षपदी महेश पाटील यांची निवड करण्यात आली असून ११ उपाध्यक्ष, ५ सरचिटणीस आणि १० चिटणीस तर इतर पदांची नेमणूक जाहीर करण्यात आली. भाजयुमोची कार्यकारिणी अनेक दिवसांनी जाहीर झाली असली तरी त्यात शिफारशींचा मोठा खेळ झाला आहे. भाजपच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये असलेल्या गटबाजीचा परिणाम या यादीत दिसून आला. पदे वाटप करताना देखील भेदभाव झाल्याची चर्चा सुरू असून काहींनी आपल्या पक्षश्रेष्ठींकडे देखील नाराजी व्यक्त केली आहे. जुन्या निष्ठावान कार्यकर्त्यांना देखील डावलण्यात आले असून त्यावरून भाजप कार्यालयात शाब्दिक वाद देखील झाल्याची चर्चा आहे. निवडीनंतर पक्षातील पाच वरिष्ठ पदाधिकाऱ्यांमध्ये कार्यालयात बंदद्वार चर्चा होऊन त्याठिकाणी एका ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने आपल्या निकटच्या सदस्याचा यादीत समावेश न केल्यावरून संताप केल्याची चर्चा सध्या रंगत आहे.

भाजप कार्यालयात झालेला हा वाद, गटबाजी आणि नाराजीचे प्रकरण ज्येष्ठ नेते ना.गिरीश महाजन आणि इतर पक्ष श्रेष्ठींच्या कानावर पोहचले असून ते जिल्ह्यात परतल्यावर काय निर्णय घेणार याकडे लक्ष लागून आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी युवकांच्या संघटनांवर भर देत सशक्त भारताच्या निर्मितीचे स्वप्न पाहत असताना जिल्ह्यात युवा नाराज झाल्यास आगामी वोट बँकेवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. दरम्यान, भाजयुमोचे अध्यक्ष महेश पाटील यांच्याशी याबाबत संपर्क साधला असता, पक्षात कोणतीही नाराजी नसून कोणाचाही वाद झाला नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. जिल्हाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्या दिल्ली येथे अधिवेशनाला असल्याने तांत्रिक अडचणीमुळे संपर्क होऊ शकला नाही.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button