जामनेर पंचायत समितीला ISO 9001:2015 मानांकन; जिल्ह्यातील पहिली दर्जा प्रमाणित पंचायत समिती

जळगाव प्रतिनिधी – जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आलेल्या ग्रामपंचायत व पंचायत समित्यांच्या सक्षमीकरण मोहिमेला मोठे यश मिळाले आहे. या मोहिमेच्या पहिल्या यशस्वी टप्प्यात जामनेर पंचायत समितीने ISO 9001:2015 हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे मानांकन प्राप्त करून जिल्ह्यातील पहिली ISO प्रमाणित पंचायत समिती होण्याचा मान पटकावला आहे.
गुणवत्तापूर्ण व पारदर्शक प्रशासनाची फलश्रुती
ISO मानांकन मिळवण्यासाठी जामनेर पंचायत समितीने प्रशासनिक कार्यपद्धती, सेवा वितरण, पारदर्शकता, नागरिकाभिमुखता व गुणवत्ता व्यवस्थापन यामध्ये लक्षणीय सुधारणा केल्या. दस्तऐवजीकरण प्रक्रिया, जनसेवा प्रणालीतील शिस्त, कर्मचारी प्रशिक्षण यावर विशेष भर देण्यात आला.
या यशस्वी प्रक्रियेनंतर प्राप्त झालेले ISO प्रमाणपत्र गट विकास अधिकारी श्री. कृष्ण इंगळे यांनी स्वीकृत केले.
या ऐतिहासिक यशाबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांनी जामनेर पंचायत समितीच्या संपूर्ण पथकाचे अभिनंदन केले असून, इतर पंचायत समित्यांनी देखील या यशापासून प्रेरणा घेऊन कार्यप्रणालीत सुधारणा कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
ISO मानांकन ही केवळ दर्जाची शिक्का मोर्तब नाही, तर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सुशासन व कार्यक्षमतेकडे वाटचाल करणारा एक महत्त्वाचा टप्पा ठरतो. ग्रामीण भागातील प्रशासनाच्या पातळीवर जामनेर पंचायत समितीने उंचावलेला दर्जा हा जिल्ह्याच्या विकासात मैलाचा दगड ठरणार आहे.