नवीन प्रोजेक्टचा ऍडव्हान्स भरण्याच्या नावाखाली 95 लाखांना गंडा घालणारे ‘त्रिकूट’ जाळ्यात !
धुळे सायबर पोलिसांची कामगिरी
धुळे I प्रतिनिधी I ;- कंपनीचे डायरेक्टर असल्याचे भासून कंपनीच्या अकाउंटंटला व्हाट्सअपद्वारे मेसेज करून नवीन प्रोजेक्टची बोलणी फायनल झाल्याचे सांगून प्रोजेक्टच्या ऍडव्हान्स भरण्याच्या नावाखाली 95 लाख रुपये संबंधित अकाउंटवर आरटीजीएस द्वारे भरण्याचे सांगून 95 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांना धुळे सायबर पोलिसांनी अटक केली आहे.
याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, महाराष्ट्र ओईल एक्स्ट्रक्शन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचे डायरेक्टर असल्याचे सांगून कंपनीचे अकाउंटंट यांना 24 नोव्हेंबर रोजी व्हाट्सअप द्वारे मेसेज करून प्रोजेक्टच्या ऍडव्हान्स भरण्यासाठी तात्काळ 95 लाख रुपये अकाउंट वर आरटीजीएस द्वारे रक्कम भरण्यास सांगितले. व्हाट्सअप च्या डीपीवर कंपनीच्या मालकाचा फोटो असल्याने अकाउंटंट यांनी तात्काळ 95 लाख रुपये आरटीजीएसद्वारे ट्रान्सफर केले. नंतर दुसऱ्या दिवशी 85 लाखांची मागणी केल्यानंतर अकाउंटंट ने कंपनीच्या इतर मालकांना हा प्रकार सांगितल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने याबाबत सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश घुसर यांनी पथक तयार करून तपास चक्रे फिरवली. यामध्ये नाशिक येथून मुजम्मिल मुस्ताक मणियार आणि सरफराज हुसेन शेख वय 27 आणि चांदवड येथून आवेश रफी पिंजारी याला पाठलाग करून अटक केली. त्यांना न्यायालयात हजर केले असते 25 डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सोनावण्यात आली आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश घुसर, पीएसआय संजय पाटील, पोहे को भूषण खलाणेकर, राजू मोरे, तुषार पोतदार, चेतन सोनगिरी, प्रसाद वाघ, विवेक बिराडे, महेंद्र जाधव यांच्या पथकाने केली.