डान्स बारमध्ये जळगावच्या पोलिसांची ‘मैफल’; व्हिडिओ व्हायरल होताच उचलबांगडी

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । मुंबईला गेलेल्या जळगाव पोलीस दलातील दोन कर्मचाऱ्यांना डान्स बारची वारी चांगलीच महागात पडली आहे. डान्स बारमध्ये बसल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी या दोन्ही कर्मचाऱ्यांची तत्काळ पोलीस मुख्यालयात बदली केली असून त्यांच्याविरुद्ध चौकशीचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पाटील आणि चाळीसगाव शहर पोलीस ठाण्याचे निलेश पाटील हे मुंबईला गेले होते. मात्र, तिथे दोघेही मुंबईतील एका डान्स बारमध्ये गेल्याचे समोर आले आहे. तेथे बसलेले असतानाचा त्यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला.
दोघांवर प्रशासकीय कारवाई
या प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलीस अधीक्षकांनी लागलीच पावले उचलली आहेत. दोन्ही कर्मचाऱ्यांची सध्याच्या नियुक्तीवरून पोलीस मुख्यालयात रवानगी करण्यात आली आहे. तसेच ‘डीवायएसपी’ दर्जाच्या अधिकाऱ्यांमार्फत या प्रकरणाची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. चौकशीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर या कर्मचाऱ्यांवर कठोर शिस्तभंगविषयक कारवाई होण्याची शक्यता आहे.
प्रकरणाची सखोल चौकशी सुरू : पोलीस अधीक्षक
“संबंधित कर्मचाऱ्यांचा व्हिडिओ समोर आल्यानंतर त्यांची मुख्यालयात बदली करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू असून, अहवालानुसार पुढील कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी यांनी दिली आहे.





