
तृतीय पंथीयांना शांतपणे जीवन जगण्याची संधी द्यावी.
भुसावळच्या तृतीय पंथीय संघटनेची पत्रकार परिष्देमध्ये मागणी
भुसावळ, भुसावळ येथील निसर्ग तृतीय पंथ विकास फाऊंडेशन च्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन गेल्या वर्षभरापासून त्यांना होत असलेल्या त्रासाविषयी तक्रार व्यक्त केली. . त्यांनी संगीतले किकाही समाजकंटक आणि पोलिस प्रशासनाच्या चुकीच्या कारवायांमुळे त्यांच्यावर अन्याय होत आहे.
संस्थेच्या अध्यक्षा रेशमा जान काली आप पठाण आणि प्रमुख सल्लागार आशु श्रावण बाविस्कर, राजेश उर्फ राखी सूर्यवंशी, दया ठाकुर, ज्योती जान यांच्यासह इतर पदाधिकाऱ्यांनी माध्यमांसमोर आपले मत व्यक्त केले .
खोट्या तक्रारी आणि अडथळे
पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, भुसावळमध्ये वास्तव्यास असलेल्या तृतीय पंथीयांमध्ये काही नकली किन्नर मिसळले असून, त्यांचा गुन्हेगारीशी संबंध आहे. मात्र, निसर्ग तृतीय पंथ विकास फाऊंडेशन मधील सदस्य हे शांतताप्रिय असून त्यांनी कोणत्याही गुन्ह्यांमध्ये सहभाग घेतलेला नाही. तरीही, पोलिसांकडून त्यांच्यावर अन्याय केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.
विशेषतः २२ मार्च २०२५ रोजी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मंत्री यांच्या समोर चुकीची माहिती देऊन संस्थेवर कार्यवाही करण्याची मागणी करण्यात आली. त्यानंतर भुसावळ पोलिसांनी बाहेरून आलेल्या किन्नरांना हाकलण्याचे आदेश दिले. या संदर्भातील मंत्री आणि पोलिस अधिकाऱ्यांच्या संभाषणाची व्हिडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर संस्थेवर अधिक दबाव टाकण्यात आला आहे.
संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले की, ते अनेक वर्षांपासून भुसावळ येथे स्थायिक असून त्यांचे आधारकार्ड आणि इतर अधिकृत कागदपत्रे याच ठिकाणच्या पत्त्यावर आहेत. त्यामुळे त्यांना बाहेरून आलेले म्हणून हाकलण्याचा आरोप चुकीचा असल्याचे त्यांनी सांगितले.
समाजसेवेतील योगदान
संस्थेने समाजासाठी विविध उपक्रम राबवले आहेत. गोरगरीबांसाठी अन्नदान, आठवडे बाजारात पाणीवाटप आणि इतर समाजसेवी कार्यामध्ये त्यांनी महत्त्वाचे योगदान दिले आहे. त्यांनी समाजाला मदतीचा हात दिला असताना, त्यांच्याविरोधात अपप्रचार करणे दुर्दैवी असल्याचे पदाधिकाऱ्यांनी म्हटले.
संस्थेच्या सदस्यांनी विनंती केली की, त्यांनी खोटी माहिती प्रसारित करण्याचे टाळावे आणि तृतीय पंथीयांना शांतपणे जीवन जगण्याची संधी द्यावी.
“आम्ही फक्त सन्मानाने जगू इच्छितो. समाजाच्या मदतीसाठी नेहमी पुढे राहिलो आहोत, त्यामुळे आम्हाला वेठीस धरू नका,” असे भावनिक आवाहन रेशमा जान काली आप पठाण यांनी पत्रकार परिषदेत केले.