Detection

Detection Story : पालच्या जंगलात थरार, जीव धोक्यात घालून सिनेस्टाईल पकडले दोन गावठी कट्टे!

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव जिल्ह्यात गावठी कट्टे पकडण्याच्या कारवाया जोरात सुरु असून पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कामाला लागले आहेत. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गोपनीय माहितीच्या आधारे पालच्या जंगलात सीमेजवळ सापळा लावला. दोन पथके दोन टोकाला ठाण मांडून बसली. माहिती खरी ठरताच पोलिसांनी धाव घेतली. नेमकी कुणकुण लागल्याने एक आरोपी पळ काढू लागला. पोलिसांनी जीव धोक्यात घालून जंगलात पाठलाग करून दोन गावठी कट्टे हस्तगत केले.

स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सहाय्यक फौजदार रवी नरवाडे व हवालदार गोपाळ गव्हाळे यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, दोन इसम सिरवेल, ता.भगवानपुरा जि. खरगोन (मध्यप्रदेश) येथून अवैधरित्या गावठी कट्टट्टे विक्री करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्रात पाल ता.रावेर मार्गे येणार आहेत. मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने त्यांनी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना बातमी कळविली.

दोन ठिकाणी लावले सापळे, बातमीदाराला पाठवले
स्थानिक गुन्हे शाखा वरीष्ठ पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी पो.उप.निरी.शरद बागल, सहाफौ. रवी नरवाडे, पो.हे.कॉ.गोपाल गव्हाळे, पो.हे.कॉ. नितीन बाविस्कर, पो.कॉ. बबन पाटील, चा.पो.हे.कॉ. दिपक चौधरी यांचे पथक तयार करुन त्यांना मिळालेल्या बातमीच्या अनुषंगाने कारवाई करणे बाबतच्या सुचना दिल्या. त्याप्रमाणे पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी रावेर पोलीस स्टेशन अंतर्गत पाल दुरक्षेत्र येथे जंगल परिसरात एक आणि जंगलाच्या दुसऱ्या बाजूला दुसरा सापळा रचला. माहितीची सत्यता तपासण्यासाठी पथकाने आपल्या गोपनीय बातमीदाराला पुढे पाठविले आणि त्याच्यावर लक्ष ठेवले.

आदिवासी भाषेत दिला आवाज, सिनेस्टाईल आवळल्या मुसक्या
मिळालेल्या माहीतीप्रमाणे पालच्या जंगल परिसरात पथकातील अधिकारी व कर्मचारी सापळा लावून थांबलेले असतांना अंदाजे ४५ वर्षाचा इसम दुचाकी क्र. एमपी.१०.झेडसी.९६५० काळया रंगाची मोटार सायकलवर डोक्याला निळी पगडी बांधलेला दिसून आला तसेच एक अंदाजे २५ वर्ष वयाचा इसम दुचाकी क्रमांक एमपी.१०.एमव्ही.१४६२ काळया रंगाची मोटार सायकलवर येतांना दिसले. त्यांना फॉरेस्ट नाका पाल येथे सापळा पथकातील अंमलदार थांबवत असतांना, ते पळून जाण्याचा प्रयत्न करु लागले. बातमीदाराने आरोपीला दगा दिल्याचे कळताच त्याने आदिवासी भाषेत आवाज दिला. त्यामुळे दोघांनी सापळ्यातुन पळुन जात धूम ठोकली. त्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करुन व पुढे दोन्ही रस्त्यावर लावलेल्या सापळ्यात दोघांना पकडण्यात पथकाला यश आले.

दोन गावठी कट्ट्यासह, दुचाकी आणि मोबाईल हस्तगत
पथकाने दोघांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडून २ गावठी कट्टयासह २ मोटारसायकली, २ मोबाईल हॅन्डसेट असा एकूण १ लाख ७० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. संशयित आरोपींची नावे गोविंदसिंग ठानसिंग बरनाला, वय- ४५, रा.सीरवेल महादेव ता.भगवानपुरा जि. खरगोन, (म.प्र.), निसानसिंग जिवनसिंग बरनाला, वय-२३, रा.उमर्टी ता.वरला जि.बडवाणी ह.मु. रा.सीवेल महादेव ता. भगवानपुरा (म.प्र.) असे आहे. दोघांना रावेर पोलीस स्टेशन हजर करण्यात आले. त्यांचे विरुध्द रावेर पोलीस ठाणे CCTNS गु.र.नं. २५४/२०२५, भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ प्रमाणे कायदेशीर कारवाई करण्यात आली असून गुन्हयाचा तपास पो.उप.निरी. तुषार पाटील करीत आहेत.

जीव धोक्यात घालून केला पाठलाग
पोलिसांनी अटक केलेल्या दोघांसोबत आणखी एक संशयित त्यांच्यावर लक्ष ठेवून होता. आरोपी गावठी कट्टा विक्रीसाठी आल्याची पोलिसांची पक्की माहिती होती. दोघे सापळ्यातून पळून जात असताना पोलीस जीव धोक्यात घालून त्यांचा पाठलाग करीत होते. आरोपींकडून प्रत्युत्तर म्हणून ते पोलिसांवर गोळीबार देखील करू शकत होते तरीही पोलिसांनी हिम्मत दाखवत त्यांच्या मुसक्या आवळल्या. पोलीस उपनिरीक्षक शरद बागल यांच्यासह पथकाने आपला सापळा यशस्वी केला.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button