Detection Story : दुचाकी, रिक्षा चोरीचे रॅकेट उघड, ६ रिक्षा, १४ दुचाकी हस्तगत
महा पोलीस न्यूज । दि.१९ ऑगस्ट २०२४ । दुचाकी, चारचाकी चोरीचे गुन्हे उघडकीस आल्याचे बऱ्याचदा ऐकण्यास येते मात्र रिक्षा चोरीचे अनेक गुन्हे एकाच वेळी उघड झाल्याचे ऐकण्यास येत नाही. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने एका दुचाकी चोरीच्या तपासाचा धागा पकडत अख्खे रॅकेटच उघड केले आहे. एलसीबीच्या पथकाने तिघांना अटक करुन त्यांच्याकडून चोरीच्या ६ रिक्षा आणि १४ दुचाकी हस्तगत केल्या आहेत. पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली.
जळगाव जिल्ह्यातील वाढत्या चोरीच्या घटना लक्षात घेता तपासाच्या सूचना पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी एलसीबीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिल्या होत्या. जळगाव शहर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्यातील दुचाकी चोरीच्या गुन्ह्याचा तपास करताना एलसीबीचे कर्मचारी संघपाल तायडे, मुरलीधर धनगर, प्रविण भालेराव, सागर पाटील यांना ती दुचाकी पाळधी ता.धरणगाव येथील युवक वापरत असून तो विक्री करणार असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्यांनी लागलीच याबाबत पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळवले.
स्वतः दुचाकी खरेदीचा केला बहाणा
पाळधी येथील एक युवकाने दोन दिवसापूर्वीच घेतलेली दुचाकी पैशांची गरज असल्याने विकत होता. एलसीबीच्या पथकाने त्याच्याशी संपर्क साधत स्वतः दुचाकी खरेदीचा बहाणा केला. दुचाकीच्या बहाण्याने त्याच्याशी संवाद साधत कुणाकडून घेतली असा तपास केला असता जाबीर सलामत शेख वय-२७ रा इदगांह प्लाट पाळधी आणि आमीन कालु मनियार वय-३९ रा रंगारी मोहल्ला पाळधी यांची नावे समोर आली. आणखी सखोल चौकशी केली असता मुस्तकीन अजीज पटेल वय-२८ रा शनिनगर देढ गल्ली पाळधी याचे देखील नाव समजले.
१४ मोटार सायकल, ६ ऑटो रिक्षा हस्तगत
पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता दोघांवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल असल्याचे समजले. पथकाने अगोदर त्यांचाकडून चोरी करून विकलेल्या १४ दुचाकी हस्तगत केल्या. आणखी तपासात त्यांनी रिक्षा चोरल्याचे समजल्याने भुसावळ ४, फैजपूर १, जळगाव १ येथून रिक्षा हस्तगत केल्या. तिघांना जळगाव शहर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलिसांनी हस्तगत केलेला मुद्देमाल २२ लाख ४० हजार रुपयांचा आहे.
कमी दरात विक्री किंवा गहाण पद्धतीचा उपयोग
चोरट्यांनी दुचाकी आणि रिक्षा जळगांव, मालेगांव, छत्रपती संभाजी नगर, खारघर नवी मुंबई, जुहू मुंबई, बारडोली येथून चोरलेल्या होत्या. बऱ्याच वाहनांना ते जळगाव आरटीओ पासिंग बनावट क्रमांक टाकून कमी किमतीत ते वाहन विक्री करीत होते किंवा कुणाकडे तरी गहाण ठेवत होते. स्वस्तात वाहने मिळत असल्याने चोरट्यांना फावले होत होते.
पथकात यांचा होता समावेश
संपूर्ण कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, अपर पोलीस अधिक्षक कविता नेरकर, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या पथकातील पोउपनि दत्तात्रय पोटे, श्रेणी पोउनि श्रीकृष्ण पटवर्धन, पोहेकॉ संघपाल तायडे, पोहवा मुरलीधर धनगर, पोना प्रविण भालेराव, पोकॉ सागर पाटील, पोहेकॉ संदिप पाटील, पोहेकॉ जयवंत चौधरी, पोकों प्रदिप चवरे, पोकों ईश्वर पाटील, पोकॉ लोकेश माळी, चापोहेकॉ दिपक चौधरी, चापोहेकॉ भारत पाटील यांच्या पथकाने केली आहे.