जळगाव : काकूसोबत अंघोळीसाठी नदीपात्रात गेलेल्या दीपीका चंपालाल बरडे (बारेला) (वय १०, मूळ रा. मध्यप्रदेश, ह. मु. बाभूळगाव, ता. धरणगाव) या तरुणीचा पाय घसरुन ती नदीपात्रात बुडाली होती. मंगळवारी रामेश्वर येथे त्या तरुणीचा मृतदेह मिळून आला. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
मध्यप्रदेशातील चंपालाल बरडे हे मजूरी कामासाठी धरणगाव तालुक्यातील बाभुळगाव येथे स्थायिक झाले आहे. त्यांच्या शेजारी त्यांची वहिणी अवणी बारेला राहतात. सोमवार दि. ४ नोव्हेंबर रोजी दुपारच्या सुमारास चंपालाल यांची मुलगी दिपीका बरडे ही काकूसह त्यांची मुलगी सिंधू व शेजारील मुलगी रिधू बारेला यांच्यासोबत नदीवर अंघोळीसाठी गेली होती. अंघोळ करत असतांना पाण्याचा अंदाज न आल्याने पाय घसरुन दीपीका ही
पाण्यात बुडाली. घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी रात्री उशिरापर्यंत नदीपात्रात मुलीचा शोध घेतला. मात्र तरी देखील ती मिळून आली नाही.
मंगळवारी सकाळचय सुमारास जळगाव तालुक्यातील रामेश्वर येथे दीपीका हीचा मृतदेह नदीपात्रात तरंगतांना आढळून आला. त्यानुसार तालुका पोलिस ठाण्यातील पोहेकॉ बापू पाटील, दिनेश चव्हाण, मिलींद सपकाळे, दीपक चौधरी यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह पाण्यातून बाहेर काढला.