
जळगाव महापोलीस न्यूज l 10 मे 2025
अमळनेर येथून मुलीचा एमबीए सीईटीचा पेपर देऊन परत येत असताना पिंप्रिं गावाजवळ झालेल्या भीषण अपघातात रामेश्वर कॉलनीतील रहिवासी पित्याचा मृत्यू झाला आहे, तर मुलगी व एक सहप्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेने रामेश्वर कॉलनीत शोककळा पसरली आहे.
मृत व्यक्तीचे नाव महेश सुरेश सोनार (वय ४५, रा. रामेश्वर कॉलनी, जळगाव) असे आहे. ते पाण्याच्या जारचा व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. शनिवारी सकाळी ते आपल्या मोठ्या मुली नयना सोनार व मित्र राजेश मिठूलाल धूत (वय ४६, रा. दौलत नगर) यांच्यासह अमळनेर येथे एमबीए सीईटी परीक्षेसाठी गेले होते.
परीक्षा आटोपून परतीच्या मार्गावर दुपारी दीडच्या सुमारास पिंप्रिं गावाजवळ त्यांच्या स्विफ्ट कारला भरधाव बोलेरो वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच डॉक्टरांनी महेश सोनार यांना मृत घोषित केले.
दरम्यान, नयना सोनार आणि राजेश धूत यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघाताची माहिती मिळताच धरणगाव पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. महेश सोनार यांच्या निधनामुळे रामेश्वर कॉलनीमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.