
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहरातील रचना कॉलनी, कासमवाडी परिसरात दत्तजयंतीनिमित्त भाविकांचे आध्यात्मिक मार्गदर्शन करणारा श्रीमद् भागवत कथेचा सात दिवसीय संगीतमय सप्ताह अत्यंत भक्तिमय आणि उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. लीलाधर ओंकार नेमाडे यांच्या पुढाकाराने दि.३० नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत हा सोहळा आयोजित करण्यात आला होता. साकेगाव येथील हभप जितेंद्र पंडीत महाराज यांनी दररोज भक्तांना भागवत धर्म, भक्तीची शक्ती, श्रीकृष्णचरित्र, तसेच धर्म, अर्थ, काम, मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थांची महती प्रभावी शब्दांत समजावून सांगितली.
दररोजच्या निरुपणात वामन अवतार, प्रह्लाद-हिरण्यकश्यपू कथा, गोपिकांचे प्रेमभक्ती, श्रीकृष्ण-उद्धव संवाद, सुदामाचरित्र असे विविध धार्मिक प्रसंगांचे देखावे सादर करण्यात आले. कथेच्या समाप्तीनंतर दररोज आरती व प्रसाद वितरण होत असल्याने परिसरात दिवसभर भक्तिमय वातावरण नांदत होते.
रविवार, दि.७ रोजी सप्ताहाचा सुंदर समारोप पार पडला. सकाळी हवन, काल्याचे कीर्तन, दुपारी महाप्रसाद, तर सायंकाळी कथेची दिंडी भक्तिमय घोषणांनी निघाली.
दिंडीने परिसर झाला मंत्रमुग्ध
संपूर्ण परिसरात ठिकठिकाणी दिंडीचे आणि ग्रंथाचे रांगोळी काढून पूजन करण्यात आले. श्री विठ्ठल मंदिर भजनी मंडळ, मेहरुण यांच्या टाळ मृदंग, ढोलकीच्या गजरात अभंग सादर करण्यात आले. दिंडीत चिमुकल्या भक्तांनी पारंपारिक वेषात ठेका धरला होता. दिंडीने संपूर्ण रचना कॉलनी, कासमवाडी परिसर भक्तिभावाने मंत्रमुग्ध झाली.
१८ रोजी दत्त कॉलनीत भजन संध्या
या भव्य धार्मिक सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी प्रभावती नेमाडे, सूरज नेमाडे, प्रांजल नेमाडे, ज्योती नेमाडे, सोनल नेमाडे यांच्यासह नातेवाईक व परिसरातील नागरिकांनी मनापासून परिश्रम घेतले. दत्तजयंती सप्ताहातील श्रीमद् भागवत कथेमुळे भक्ति, ज्ञान आणि धर्माची प्रेरणा देणारा अमृतानुभव भाविकांना मिळाला. हभप जितेंद्र पंडीत महाराज यांच्या कीर्तनाचा पुढील कार्यक्रम दि.१८ डिसेंबर रोजी दत्त कॉलनी, शाहू नगर याठिकाणी के.डी.पाटील यांच्या घरी आयोजित करण्यात आला आहे.
पहा संपूर्ण व्हिडिओ :






