जिल्हा नियोजन चा १% निधी आता दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी !- पालकमंत्री गुलाबराव पाटील

जिल्हा नियोजन चा १% निधी आता दिव्यांग बांधवांच्या हक्कासाठी !- पालकमंत्री गुलाबराव पाटील
जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे पालकमंत्री यांच्या हस्ते उद्घाटन
जळगाव समाजात कुणीही मागे राहू नये… आणि दिव्यांग व्यक्तींना सहानुभूती नव्हे, तर संधी मिळाली पाहिजे, जिल्हा वार्षिक नियोजन च्या सर्वसाधारण च्या निधीतील १% निधी आता दिव्यांग सक्षमीकरणासाठीच राखीव ठेवण्यात येणार आहे. तसेच दिव्यांग व्यक्तींच्या अचूक आकडेवारी शिवाय योजना आखता येत नाहीत. म्हणूनच शासनाने ‘राज्यातील दिव्यांग व्यक्तींचे सर्वेक्षण’ हाती घेतलं असून जळगाव जिल्ह्यासाठी ३५ लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. आता विभागाने वेळ न दवडता घरा- घरात पोहोचावं असे आवाहन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगावातील सामाजिक न्याय भवनात दिव्यांग कल्याण विभागाच्या जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी केले.*
राज्य शासनाने 2022 मध्ये स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभागाची निर्मिती केली होती. आता पर्यंत जिल्हा परिषदेच्या जिल्हा समाज विभागा मार्फत दिव्यांग कल्याणाचे कामकाज करण्यात येत होते. दिव्यांग विभाग स्वतंत्र झाल्याने शासनाने नवीन विभागाच्या प्रादेशिक कार्यासाठी एकूण 2025 पदाची निर्मिती केली आहे. राज्य शासनाच्या 100 दिवसाच्या कार्यक्रमात जिल्हास्तरावर 1 मे पासून जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे जिल्हा कार्यालय सामाजिक न्याय भवनात स्थापन करण्याचे सूचित केले होते. त्यानुसार 1 मे रोजी जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले होते.
उपस्थित दिव्यांग बांधव, भगिनी यांनी हे स्वतंत्र कार्यालय त्यांच्या उत्कर्षासाठी अत्यंत महत्वाचे ठरणार असल्याची आनंदी भावना व्यक्त केल्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण अधिकारी माधुरी भागवत यांनी केले. सूत्रसंचालन मुक्ती फाउंडेशनचे अध्यक्ष मुकुंदराव गोसावी यांनी केले. आभार निलिमा तरोटे यांनी मानले.
यावेळी माजी महापौर विष्णू भंगाळे, मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष राकेश महाजन, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त योगेश पाटील, जि.प. चे समाज कल्याण अधिकारी विजय रायसिंग, जिल्हा दिव्यांग केंद्रांचे एस. पी. गणेशकर, स्वयंदीप दिव्यांग महिला प्रकल्पाच्या मीनाक्षी निकम, राज्य कर निरीक्षक सुधीर पाटील, रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनी मेमन, नोडल अधिकारी जी. टी. महाजन, हर्शल मावळे यांच्यासह जिल्ह्यातील विविध दिव्यांग संस्थेचे पदाधिकारी, दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.