श्रीराम पाटलांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला जळगावात पडणार खिंडार!
महा पोलीस न्यूज | १० एप्रिल २०२४ | रावेर लोकसभा मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटाकडून आयात केलेले उमेदवार श्रीराम पाटील यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. श्रीराम पाटलांच्या उमेदवारीमुळे राष्ट्रवादीच्या गोटात खळबळ उडाली असून कुणाच्या तरी सोयीसाठी ही उमेदवारी जाहीर केल्याचे म्हटले जात आहे. निष्ठावान पदाधिकाऱ्यांना बाजूला सारत आयात उमेदवाराला उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
जळगाव जिल्ह्यातील दोन्ही लोकसभा मतदार संघात भारतीय जनता पक्षाचे वर्चस्व राहिले असून प्रतिस्पर्धी पक्षाकडे तगडे उमेदवार नसल्याची स्थिती होती. भाजपने आपले उमेदवार १३ मार्च रोजी जाहीर केले त्यात जळगाव लोकसभा मतदार संघातून स्मिता वाघ तर रावेर लोकसभा मतदार संघातून रक्षा खडसे यांचे नाव जाहीर करण्यात आले. जळगाव लोकसभा मतदार संघात शिवसेनेने खेळी खेळत खा.उन्मेष पाटील आणि करण पवार यांना गळाला लावले. करण पवार यांना उमेदवारी देत शिवसेनेने तगडे आव्हान उभे केले आहे. रावेर लोकसभा मतदार संघात मात्र अमोल जावळे यांना गळाला लावण्यात राष्ट्रवादी काँग्रेसला यश आले नाही.
तुल्यबळ उमेदवारांची चाचपणी
रावेर लोकसभा मतदार संघातून आ.एकनाथराव खडसे यांनी आपण निवडणूक लढणार नसल्याचे स्पष्ट करताच राष्ट्रवादी काँग्रेससमोर आव्हान निर्माण झाले. पक्षाने जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, माजी आ.संतोष चौधरी यांच्याशी चर्चा केली. दोन्ही उमेदवार तुल्यबळ आणि पक्षाशी एकनिष्ठ असलेले उमेदवार होते. संतोष चौधरींचे शक्ती प्रदर्शन आणि रविंद्र पाटलांच्या प्रचाराने अचानक माशी शिंकली आणि उद्योजक श्रीराम पाटील व कंत्राटदार विनोद सोनवणे यांचे नाव पुढे आले. पक्षाकडून तिन्ही उमेदवारांसोबत अनेकदा चर्चा करण्यात आली. सामाजिक, राजकीय, आर्थिक बाजू समजून घेण्यात आली.
श्रीराम पाटलांचा पक्ष बदलाचा प्रवास अडसर
रावेर येथील उद्योजक असलेले श्रीराम पाटील यांचा पक्षांतराचा प्रवासच त्यांना निवडणुकीला अडसर ठरणार आहे. सुरुवातीला शरद पवार यांची भेट, त्यानंतर अजित पवार यांच्याशी चर्चा आणि मग भाजपात प्रवेश असा प्रवास त्यांनी केला आहे. एकाच पक्षाशी निष्ठावान नसल्याने त्यांच्याबाबत पक्षाचे कार्यकर्ते प्रश्न उपस्थित करीत आहे. श्रीराम पाटील यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर मतदार संघात अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले असून निवडणूक प्रचारात ते कितपत सहकार्य करतात हा प्रश्न आहे. रक्षा खडसेंच्या उमेदवारीनंतर भाजपात रंगलेले राजीनामा सत्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटात देखील सुरू होण्याची शक्यता आहे.