ब्रेकिंग : महाजन – खडसेंची मुक्ताईनगर फार्म हाऊसवर चर्चा
महा पोलीस न्यूज | ४ एप्रिल २०२४ | जळगाव लोकसभा मतदार संघातून पारोळा येथील करन पवार हे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार राहणार असल्याची घोषणा उध्दव ठाकरे यांनी मुंबईत केली आहे. दुसरीकडे एकनाथराव खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा सुरू आहेत. दोन्ही घडामोडी घडत असताना जळगाव मनपाचे माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी देखील मुक्ताईनगर येथे खडसेंची भेट घेऊन चर्चा केली आहे. दोघांच्या भेटीने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जळगाव लोकसभा मतदार संघाचे खा.उन्मेष पाटील यांचा भाजपने पत्ता कापल्यानंतर ते आणि पारोळा येथील माजी नगराध्यक्ष करण पवार असे दोघे शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटात सामील झाले. दोघांना शिवसेनेत आणण्यात जळगाव जिल्हा संपर्क प्रमुख संजय सावंत आणि मनपा माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांचा मोठा वाटा आहे. दोघांचा सेनेत प्रवेश होत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आ.एकनाथराव खडसे हे दिल्लीत पोहचल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्या.
खडसे शिवसेनेत येणार की महाजन भाजपात जाणार
दिल्लीतून जळगावात आल्यावर एकनाथराव खडसेंनी आपल्या फार्म हाऊसवर काही निकटवर्तीय आणि सहकाऱ्यांशी गुप्त बैठक घेत चर्चा केली. तसेच माध्यमांना देखील प्रतिक्रिया देत भाजप प्रवेशाबाबत सूतोवाच केले. जळगावात परतल्यावर मनपा माजी विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांनी देखील मुक्ताईनगर येथे खडसेंची भेट घेऊन चर्चा केली आहे. महाजन-खडसे भेटीमध्ये वेगळे राजकारण असल्याचे बोलले जात आहे. महाजन खडसेंना आपल्या गळाला लावत शिवसेनेत प्रवेश करवून घेतात की महाजन स्वतःच खडसेंसोबत भाजपत जातात असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
लेवा पाटील मतांसाठी घेतली भेट
दरम्यान, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार करण पवार यांना विजयी करण्यासाठी सुनील महाजनांना देखील प्रतिष्ठा पणाला लावावी लागणार आहे. जळगाव लोकसभा मतदार संघात लेवा पाटील समाजाची मते मोठ्या प्रमाणात असून खडसेंचे संबंध देखील इतर समाजात चांगले आहेत. एकनाथराव खडसेंच्या मर्जीतील मते करण पवारांच्या पारड्यात पाडून घेण्यासाठी ही भेट असल्याचे बोलले जात आहे.