आश्वासनांनी भुलविणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करा – एकनाथराव खडसे
जळगाव (प्रतिनिधी) : शहर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष – महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांच्या प्रचारार्थ आज (दि. १५) रोजी सुभाष चौक येथे महाविकास आघाडीचे ज्येष्ठ नेते आ. एकनाथराव खडसे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. आठ वर्षांनंतर सुभाष चौकात जाहीर सभेला संबोधित करत एकनाथराव खडसे यांनी चौफेर फटकेबाजी करत आपल्या खास शैलीत महायुतीचा खरपूस समाचार घेतला.
सभेत सुरुवातीला मुकुंद सपकाळे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बोलतांना ते म्हणाले की, शहरात सिव्हील हॉस्पिटलसमोर असलेल्या जागेवरील महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत भगवान बुध्द यांचा पुतळा हटविण्याचे षडयंत्र रचणाऱ्या भाजपाचे मंत्री आणि चाळीसगावचे आमदार यांच्या उमेदवाराला ठरवून पाडा. त्यानंतर अयाजभाई नियाज, भारतीय कामगार संघटना व दलित पँथरचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेश सोनवणे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्याम तायडे, आरपीआयचे जे.डी.भालेराव यांनी आपली मनोगते व्यक्त केली
आपले मनोगत व्यक्त करताना उमेदवार जयश्री सुनिल महाजन यांनी सांगितले की, शहरात बेरोजगारीचा प्रश्न आ वासून उभा आहे. विस्तारीत एम.आय.डी.सी. होणे तर सोडाच पण असलेले उद्योगही बंद होत आहेत. यामुळे बेरोजगारीची कुऱ्हाड अनेकांवर कोसळली आहे. जळगावकरांना अवैध धंदे करणारा नव्हे तर जळगावात विद्यार्थी घडविणारा, शिक्षित करणारा, त्यांच्या भविष्यासाठी विचार करणारा आमदार हवा आहे. आपल्या ज्येष्ठांनाही डावलणारे तुमची काय स्थिती करतील याचा विचार करा. शहरातील सर्व भगिनी कोणत्याही प्रलोभनाला भुलून न जाता माझ्या बंधूंसह माझ्या पाठीशी उभे राहतील. जनतेने मतरुपी आशिर्वाद दिल्यास शहरातील संकल्पित प्रति दीक्षाभूमीचा प्रकल्प निश्चितच उभा राहील, शहरात औद्योगिक विकास करण्यासाठी विविध कंपन्यांना जळगावात आमंत्रित करून, तरुणांना रोजगार उपलब्ध करुन देण्यास माझे प्राधान्य असेल. यासोबतच पर्यटन, दळणवळण आदींचा विकास करुन जळगावचा पैसा जळगावात वाढून शहराचा आर्थिक विकास होण्यासाठी कायम प्रयत्नरत राहील.
ज्येष्ठ नेते व माजी मंत्री एकनाथराव खडसे यावेळी बोलतांना म्हणाले की, निवडणुका दर पाच वर्षांनी येतात. या माध्यमातून दर पाच वर्षांनी आपला लोकप्रतिनिधी निवडून देण्याची संधी डॉ.बाबासाहेबांच्या संविधानाने मतदारांना दिली आहे. त्यामुळे मागच्या लोकप्रतिनिधीने काय केल? आणि नवीन लोकप्रतिनिधी काय करणार आहे याचं मूल्यमापन करण्याची संधी तुम्हांला मिळाली आहे. मागच्या दहा वर्षात काय झालं? कापसाला भाव आला, रोजगाराची संधी आली, नवीन उद्योग आला, रस्ते झाले, अमृत योजना पूर्ण झाली. महापौर असतांना जयश्रीताई महाजन यांनी शहर विकासाचे काम केले पण विरोधी पक्षातील असल्याने, त्यांचा निधी रोखला गेला. सरकार कुणाचंही असलं तरी जनता आपली असते. या जनतेसाठी काम करण्यासाठी लोकांनी लोकप्रतिनिधी निवडून दिलेला असतो.
शहर विकासासाठी १०० कोटी आलेत, या शहराला सिंगापूर करण्याची स्वप्न दाखवली गेली. निवडणुका आल्या योजना जाहीर करायची. पण आलेले पैसे कुठे जिरतात हे काय जनतेला कळत नाही का. साड्या वाटल्या, भांडे वाटले, लाडक्या बहीणीला १५०० रुपये दिले आणि गोडेतेल ५० रुपयांनी वाढवले. जीवनावश्यक वस्तूंचे दर इतके वाढवले की ऐन दिवाळीत सामान्य जनतेच्या तोंडचा घास हिरावला. शेतमालाला भाव मिळत नसल्याने, शेतकरी आर्थिक विवंचनेत सापडला आहे. आज कापूस, सोयाबीनला भाव मिळत नाहीये. निसर्ग साथ देत नाही आणि सरकार विचार करत नाही. जाहिरातीत सुखी दाखविणारा शेतकरी प्रत्यक्षात किती दुःखी आहे याची सरकारला काळजीच नाही.
महायुतीचे सरकार केवळ घोषणा करणारे खोटारडे सरकार आहे. एकतरी घोषणा पूर्ण केली आहे. केळी महामंडळ, लेवापाटील, गुजर समाजासाठी महामंडळ या केवळ घोषणा केल्यात. एक तरी घोषणा प्रत्यक्षात कागदावर उतरली का? एका बाजूला म्हणायचं भ्रष्टाचारमुक्त शासन आणि दुसरीकडे भ्रष्टाचारी नेत्यांना मांडीवर बसवलं. या राज्याच्या गृहमंत्र्यालाच धमक्या येतात, तिथे तुम्हा आमची काय स्थिती असेल याचा विचार करा. कायदा व सुव्यवस्थेचे इतके धिंडवडे निघालेत. प्रश्न पडतो की हे बिहार आहे की महाराष्ट्र. इथे सर्वसामान्य माणसाला संरक्षण नाहीये तर गुन्हेगारांना संरक्षण आहे. अवघ्या महाराष्ट्राचं आराध्यदैवत असणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्यामध्ये गैरव्यवहार करणारं हे सरकार आहे. केवळ मतांसाठी त्यांचा नावाचा वापर करण्याव्यतिरिक्त या सरकारने काही केलं नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात कधीही न घडलेल्या फोडाफोडीचं घाणेरडे राजकारण करुन अस्तित्वात आलेलं हे सरकार तुम्हांआम्हांला कधी विकून टाकतील याचा नेम नाही.
महाराष्ट्र एकेकाळी शिक्षण पंढरी होती. या सरकारने सरकारी नोकऱ्यांवर स्थगिती आणली. शिक्षीत झालेले हजारो तरुणांवर आजही बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे. महाविकास आघाडीचे सरकार आल्यास शेतकऱ्यांचे तीन लाखाचे कर्ज माफ होईल, महिलांना तीन एलपीजी सिलेंडर मोफत मिळतील, अडीच लाख बेरोजगार तरुणांना नोकरी संधी मिळेल, ज्याला नोकरी मिळणार नाही, त्याला नोकरी मिळेपर्यंत ४ हजार रुपये बेरोजगार भत्ता दिला जाईल.
महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री सुनिल महाजन या उच्चशिक्षीत आहेत, त्यांच्याकडे वत्कृत्व कौशल्य आहे, शहरातील तळागाळातील जनतेपर्यंत त्या पोहचलेल्या आहेत. महापौर पदाच्या कालखंडात त्यांनी जळगावची नस ओळखली आहे. महायुतीच्या सरकारचे घाणेरडं राजकारण संपविण्यासाठी राज्यात आता महाविकास आघाडीचं सरकार येणे गरजेचे आहे. या सरकारचा कावा सूज्ञ व जाणकार जळगावकरांना कळला आहे. ते खोटं बोलणाऱ्या, आश्वासनांनी भुलविणाऱ्या महायुतीच्या उमेदवाराला पराभूत करुन या महाराष्ट्राच्या भूमीतील इतिहास घडवावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी शरद तायडे, श्यामभाऊ तायडे, राजूभाऊ मोरे, उदय पाटील, राहुल भालेराव, मुजीब पटेल, जाकीर बागवान, सुनिल महाजन, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे मंगलाताई सोनवणे, अशोक लाडवंजारी, मुकुंद सपकाळे, अयाजभाई, राजेश सोनवणे, उत्तमराव सपकाळे, रईसभाई बागवान, अयाजभाई नियाज, पियुष गांधी, अमित जगताप, आरपीआयचे जे.डी.भालेराव तसेच महाविकास आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन संदीप केदार यांनी केले.