जळगाव मनपा : कुलभूषण पाटलांचा पराभव करणारे जाकीर पठाण कोण?

महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । जळगाव शहर महानगरपालिका निवडणुकीच्या निकालानंतर मतमोजणीवेळी झालेला गोंधळ आणि पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जच्या घटनेने शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील यांची चर्चा सुरू आहे. कुलभूषण पाटील यांचा निसटता पराभव झाल्याने भाजपचे उमेदवार जाकीर पठाण कोण हा देखील अनेकांना प्रश्न पडला आहे.
प्रभाग क्रमांक १० ड मधून भारतीय जनता पक्षाकडून निवडणूक लढवलेले जाकीर खान रसूल खान उर्फ जाकीर पठाण हे राजकारणात नवखे नसून खान कुटुंबातील ते तिसरे नगरसेवक आहेत. जाकीर खान यांचे वडील रसूल पठाण आणि आई मुख्तारबी पठाण हे यापूर्वी जळगाव मनपात नगरसेवक होते. दोघांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून निवडणूक लढवली आणि विजय संपादन केला होता.
निसटता पराभव आणि निसटता विजय
२०१८ च्या निवडणुकीत मुख्तारबी पठाण यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली आणि अवघ्या १५ मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यांनतर जाकीर पठाण यांनी शिवसेना उबाठा महानगर प्रमुख अल्पसंख्याक आघाडी हे पद भूषवत नेहमी जनसंपर्क कायम ठेवला. गेल्या महिन्यातच त्यांनी भाजपात प्रवेश केला आणि निवडणूक लढवली. यावेळी अवघ्या १७६ मतांनी त्यांनी विजय मिळवत माजी उपमहापौर कुलभूषण पाटील यांचा पराभव केला.





