
महा पोलीस न्यूज । चेतन वाणी । चाळीसगाव नगरीचे लाडके माजी आमदार राजीव देशमुख यांचे मंगळवारी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. धुळे येथे उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अकस्मात जाण्याने चाळीसगावच्या प्रत्येक घरात शोककळा पसरली असून, राजकीय, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाली आहे.
राजीव देशमुख हे केवळ राजकारणी नव्हते, तर चाळीसगावच्या जनतेच्या हृदयात स्थान मिळवणारे कुटुंबातील एक सदस्य होते. त्यांचे आजोबा स्व.रामरावदादा आणि वडील स्व.अनिलदादा देशमुख यांच्या पावलावर पाऊल ठेवत त्यांनी आपल्या कर्तृत्वाने चाळीसगावच्या विकासाला दिशा दिली. स्व.अनिलदादा यांनी २७ वर्षे सलग नगराध्यक्षपद भूषवून चाळीसगावला महाराष्ट्राच्या नकाशावर स्थान मिळवून दिले. बेलगंगा साखर कारखान्याचे अध्यक्ष, वैधानिक महामंडळाचे संचालक, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ लोकल बोर्डाचे उपाध्यक्ष आणि जिल्हा बँक संचालक अशा विविध पदांवर त्यांनी काम करताना शहरात शांतता आणि जातीय सलोखा कायम राखला. त्यांना चाळीसगावचे शिल्पकार म्हणून आदराने संबोधले जायचे. त्यांचा हा प्रेरणादायी वारसा राजीव देशमुख यांनी हृदयापासून जपला.
स्व. अनिलदादा यांच्या २००१ मधील निधनानंतर राजीव देशमुख यांची नगरसेवकपदी बिनविरोध निवड झाली, तेव्हा ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष होते. येथूनच त्यांच्या सार्वजनिक आणि सामाजिक कारकीर्दीला खऱ्या अर्थाने बहर आला. आपल्या संघटन कौशल्याने आणि मनमिळाऊ स्वभावाने त्यांनी प्रत्येकाच्या मनात स्थान मिळवले. पुढे नगरपालिका निवडणुकीत ते पुन्हा नगरसेवक म्हणून निवडून आले, तर त्यांच्या पत्नी पद्मजा देशमुख यांनी थेट निवडणुकीत नगराध्यक्षपद मिळवून देशमुख परिवाराची सामाजिक आणि राजकीय पकड कायम राखली.
जेव्हा चाळीसगाव विधानसभा मतदारसंघ ४० वर्षांनंतर खुला झाला, तेव्हा राजीव देशमुख यांना आमदारकीची संधी मिळाली. या संधीने त्यांच्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केले आणि त्यांनी आपल्या कार्याने चाळीसगावकरांच्या आशा-अपेक्षांना उजाळा दिला. राजकारणाबरोबरच सामाजिक, क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रातही त्यांनी आपली रुची आणि योगदान कायम ठेवले. त्यांचा हसतमुख चेहरा, मैत्रीपूर्ण वृत्ती, सहकार्याची तयारी आणि सर्वांशी आदराने वागण्याची वृत्ती यामुळे ते प्रत्येकाच्या हृदयात घर करून गेले.
आमदारकीच्या काळात त्यांनी चाळीसगाव एम.आय.डी.सी.ची स्थापना, गिरणा धरणातून शहराला पाणीपुरवठा करणारी योजना आणि वरखेडे धरणाची सुरुवात यासारख्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पांना गती दिली. या कामांनी चाळीसगावच्या विकासाला नवे परिमाण मिळाले. जिद्द, निष्ठा आणि कर्तव्यदक्षतेने त्यांनी आपला राजकीय आणि सामाजिक प्रवास अविरत सुरू ठेवला.
आज राजीव देशमुख यांच्या निधनाने चाळीसगावने एक निष्ठावान, कर्तृत्ववान आणि मनमिळाऊ नेते गमावले आहे. त्यांचा हसरा चेहरा, प्रत्येकाला आपलंसं करणारा स्वभाव आणि समाजासाठी अखंड झटणारी वृत्ती कायम स्मरणात राहील. त्यांच्या कार्याचा आणि प्रेमाचा ठसा चाळीसगावच्या मातीत कायम कोरला जाईल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.






