Exclusive : रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत चौकी बंद, अवैध धंदे सुरू..

महा पोलीस न्यूज । दि.३ जानेवारी २०२५ । जळगाव शहरात अनेक ठिकाणी खुलेआम अवैध धंदे सुरू असून त्यातच रामानंद नगर पोलीस ठाणे हद्दीत जरा जास्तच आहे. रामानंद हद्दीत असलेल्या पोलीस चौकी बंद असून चौकाचौकात अवैध धंदे सुरू आहेत. हद्द वाळूमाफियांचे तर माहेर घरच असून सध्या सर्वत्र अवैध वाळू वाहतूक बंद असल्याने ते देखील शांत आहे.
जळगाव शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्याची हद्द मोठी असून गुन्हेगारी देखील मोठ्याप्रमाणात आहे. अनेक लहानमोठ्या आणि वाढीव वस्त्यांचा रामानंदच्या हद्दीत समावेश होतो. रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कमी करण्यासाठी अनेक ठिकाणी चौकी उभारण्यात आली आहे.
पोलीस चौकी बंदावस्थेत..
रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रामानंद नगर स्टॉप, महाबळ चौक, डी मार्ट, पिंप्राळा हुडको परिसरात पोलीस चौकी उभारण्यात आली आहे. महा पोलीस न्यूजने केलेल्या पाहणीत अनेक पोलीस चौकी बंदावस्थेत असल्याचे आढळून आले. पोलीस चौकी बंद असल्यानेच गुन्हेगारांचे फावले होत असते. विशेष म्हणजे एरव्ही पोलीस चौकीच्या समोरून बिनधास्त वाळू वाहतूक देखील होते.
चौकाचौकात सट्टापेढी, दारूड्यांमुळे जनतेला त्रास
अवैध धंदे तसे जळगाव शहरात सुरूच आहेत त्यातच रामानंद नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत तर मुख्य चौकात बिनधास्तपणे सट्टा पेढी सुरु आहे. रामानंदनगर पाण्याच्या टाकीजवळ मोबाईलवर, घाटाच्या खाली टपरीवर, वाघ नगर मुख्य चौकात संकुलात, खंडेराव नगर पुलाजवळ, पिंप्राळा हुडको परिसरात सट्टा पेढी सुरू आहे. दिवसभरात एकही पोलीस कर्मचाऱ्याला ही पेढी दिसत नाही.
अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक
रामानंद नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ एक कर्तव्यदक्ष अधिकारी असून त्यांची कार्यशैली दमदार आहे. पोलीस ठाण्यातील काही कर्मचारी स्वतःलाच अधिकारी समजू लागले असून परस्पर निर्णय घेत असतात. बहुतांश विषय अधिकाऱ्यांना देखील माहिती नसतात. जळगाव शहरात नुकतेच अवैध गॅस भरणा केंद्रावर झालेल्या स्फोटात ७ लोकांना प्राण गमवावे लागले. इतके होऊन देखील रामानंद नगर हद्दीत पिंप्राळा हुडको येथे एलसीबी पथकाने ४ ठिकाणी छापेमारी करून कारवाई केली. कर्मचारी अधिकाऱ्यांच्या डोळ्यात धूळफेक करत असल्यानेच अधिकाऱ्यांचे नुकसान होते.