पाचोरा तालुक्यात एलसीबीकडून गावठी दारूची भट्टी उध्वस्त, दीड लाखांचा माल जप्त
महा पोलीस न्यूज । दि.९ सप्टेंबर २०२४ । जिल्ह्यात सध्या अवैध गावठी दारु बनविण्याच्या भट्टयामध्ये वाढ होत असल्याने त्यांचेवर कारवाई करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना दिले होते. त्यावरुन एलसीबीच्या पथकाने पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी आणि गाळण बु शिवारात छापा टाकला. दोन्ही ठिकाणी भट्टी उध्वस्त करीत पोलिसांनी दीड लाखांचा माल जप्त केला.
पाचोरा तालुक्यातील सातगाव डोंगरी शिवारात सुपडु तडवी व गाळण बु शिवारात अमोल जाधव हे बाभूळ जंगल भागात गा.ह.भ.ची भट्टी लावून दारू गाळीत आहे अशी बातमी गुप्तबातमीदारामार्फत एलसीबीचे हवालदार लक्ष्मण पाटील, जितेंद्र पाटील, भुषण पाटील यांना मिळाली होती. त्यांनी माहिती पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांना कळविल्याने त्यांनी सदर भागात जावून बातमीची खात्री करून पुढील योग्य ती कारवाई करा असे आदेश दिले होते.
पथकाने खात्री करून त्याठिकाणी छापा टाकला असता घटनास्थळी सातगाव डोंगरी ता.पाचोरा शिवारात सुपडु रहेमान तडवी यांच्याकडून ५४ हजार ४४० रुपये किंमतीचे गावठी दारु बनविण्याचे साधनासह रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू आणि रोख रुपये असे जप्त करून त्याबाबत पिंपळगाव हरेश्वर पो.स्टे.ला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पथकाने गाळण बु ता.पाचोरा शिवारात अमोल राजेंद्र जाधव रा.पाचोरा यांचे कडून ८० हजार ७५० रुपये किंमतीचे गावठी दारु बनविण्याचे साधनासह रसायन व तयार गावठी हातभट्टीची दारू आणि रोख रुपये असे जप्त करून त्याबाबत नगरदेवळा औटपोस्ट गुन्हा दाखल करण्यात आला आहे.