दुचाकी शोरूमला, अपघात रस्त्यावर : विमा रकमेसाठी बनावट दस्तऐवज, बाप लेकासह एकाविरुद्ध गुन्हा
महा पोलीस न्यूज | ३ जून २०२४ | अलीकडच्या काळात फसवणुकीचे प्रकार वाढतच चालले असून कोणीही कोणत्याही प्रकारे फसवणूक करीत आहे. नागपूर ग्रामीण भागातील काटोल पोलिसांनी अशीच एक फसवणूक शोधून काढली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत अपघात लपवत विमा रक्कम लाटण्यासाठी तपासी अधिकारी यांची दिशाभुल केली तसेच आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड नागपुर इंन्शुरन्स कंपनीची मो.सा गुन्हयात खोटी दाखवुन नुकसान भरपाई मिळवण्याकामी फसवणुक करुन बनावट दस्तऐवज तयार केल्याचे निष्पन्न झाले आहे. याप्रकरणी दोन वर्षांनी बाप लेकासह एकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नागपूर येथील आय.सी.आय.सी.आय.लोम्बार्डचे कन्सलटंट दिनकर चंद्रभान सावरकर वय ६४ वर्ष यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, मी आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड इंन्शुरन्स नागपुर कंपनी येथे मागील ६ महिन्यापासुन नौकरी करतो. काटोल येथे अप क्रमांक ८४३/२०२२ कलम २७९, ३०४ (अ) भादवि गुन्हयात आय.सी.आय.सी.आय.लोम्बार्ड नागपुर इंन्शुरन्स कंपनीची फसवणुक झाल्याबाबत दिनांक १५ डिसेंबर २०२३ रोजी अर्ज सादर केला होता. त्या अर्जाची चौकशी स.पो.नि शितल खोब्रागडे पोस्टे काटोल यांनी केली आहे. वास्तविक पाहता अर्ज चौकशीमध्ये सत्यपरीस्थिती निष्पन्न झाली आहे. त्यावरुन चौकशी अधिकारी यांनीच या प्रकरणात स्वतःसरकारतर्फे फिर्याद देणे आवश्यक होते. तत्कालीन प्रतिनिधी यांनी विमा कंपनी कन्संलटट पदाचा राजीनामा दिल्याने मी सदर प्रकरणात आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड नागपुर इंन्शुरन्स यांचेकडुन फिर्याद देत आहे.
जुनी दुचाकी देत घेतली नवीन दुचाकी पण..
मोटार सायकल क्रमांक दुचाकी क्रमांक एम.एच.४०.सी.ई.१५०१ ही दिनेश नामदेव राऊत रा.राजनी ता.काटोल जि.नागपुर यांनी दि.१९ ऑगस्ट २०२२ रोजी डेहनकर अँटोमोबाईल यांना एक्सचेंजमध्ये देऊन शोरुममधुन नवीन मोटार सायकल एच.एफ. डिलिक्स माँडेल मोटार सायकल विकत घेतली होती. म्हणजेच दि.१९ ऑगस्ट २०२२ पासून १५ नोव्हेंबर २०२२ पावेतो दुचाकी क्रमांक एम.एच.४०.सी.ई.१५०१ ही डेहनकर आँटोमाबाईल शोरुम दुकानात उभी होती.
शोरूम मालकाने व्यवहार केला रद्द
दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजी डेहनकर आँटोमोबाईल दुकानात नामदेव टिपले यांनी जाऊन जुनी दुचाकी क्रमांक एम.एच.४०.सी.ई.१५०१ ही ५७ हजार रुपयात खरेदी करुन २० हजार रुपये रोख रक्कम जमा केली व शोरुम मधुन कोणासोबत तरी फोनवर बोलत असताना आँटोमाबाईल शोरुमचे मालक डेहणकर यांना त्याचा सशंय आल्याने त्यांनी मोटार सायकल विकण्याचा सौदा त्याच दिवशी त्यांनी रद्द करुन लेखी पावती दिली आहे. त्यानंतर १५ नोव्हेंबर २०२२ रोजी प्रदिप भाऊराव हिरुरकर रा. आमणेर त.वरुड जि.अमरावती हे डेहणकर ऑटोमोबाईल शोरुममध्ये जाऊन सेल्समनकडून दुचाकी क्रमांक एम.एच.४०.सी.ई.१५०१ ही ५७ हजार रुपये रोख देऊन खरेदी करुन घेऊन गेले.
बाप लेकाचा झाला होता अपघात
टिपले यांचा अपघात हा ११ नोव्हेंबर २०२२ रोजी १२.३० वाजता घडलेला आहे. नामदेव टिपले त्याची पत्नी व मुलगा भुषण असे ट्रिपल सिट त्याचे स्वतःच्या: मोटारसायकलने जात होते. मुलगा भुषण टिपले वय १९ वर्ष हा मोटारसायकल चालवित असताना मोटारसायकलची ठोस झाल्याने तिघेही किरकोळ जखमी झाले होते. त्यांनी प्रथमोउपचार डॉ.विवेक हिरुडकर कारंजा(घा) जि.वर्धा तसेच ग्रामीण रुग्णालय काटोल येथे उपचार केला आहे. उपचारात सुनिता नामदेव टिपले एम.एल.सी नंबर ५०९१५, भुषन नामदेव टिपले वय १९ वर्ष एम.एल.सी नंबर ५०९१७, नामदेव धोंडबाजी टिपले वय ५० वर्ष एमएलसी नंबर ५०९१६ दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ असा आहे.
विमा रक्कम मिळवण्यासाठी रचला कट
अपघाताच्या गुन्हयामध्ये नामदेवराव यांचा मुलगा भुषण टिपले हा ट्रिपल सिट वाहन चालवित असताना त्याच्याकडे परवाना नसताना तसेच तो चालवत असलेली मोटार सायकलचा विमा नसल्याने तसेच मृत व्यक्तीचा नुकसान भरपाई दावा दाखल होईल या भितीने तसेच मृत व्यक्तीस नुकसान भरपाई मिळावी या उद्देशाने प्रदिप भाऊराव हिरुरकर व नामदेव धोंडबाजी टिपले यांनी संगनमत करुन कट रचला. दोघांनी गुन्हयात आय.सी.आय.सी.आय.लोम्बार्ड नागपुर इंन्शुरन्स कंपनी विमा पॉलीसी धारक असलेली मोटारसायकल क्रमांक एम.एच.४०.सी.ई.१५०१ ही डेहनकर आँटोमोबाईल काटोल येथुन दिनांक १५ नोव्हेंबर २०२२ रोजी ५७ हजार रुपयात खरेदी करुन व नामदेव टिपले यांनी १०० रुपयाचे स्टॅम्प पेपर दि.२२ नोव्हेंबर रोजी आणि प्रदिप हिरुडकर यांनी १०० रुपयाचा स्टॅम्प पेपर दि.९ नोव्हेंबर रोजी स्टॅम्प वेन्डर अशोक लक्ष्मणराव टुले रा.काटोल यांच्याकडून विकत घेतला.
तपासअधिकारी यांची केली फसवणूक
दोघांनी स्टॅम्प पेपरवर खोटा प्रतिज्ञालेख तयार करुन तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक जवाहर चव्हाण यांची दिशाभुल केली तसेच आय.सी.आय.सी.आय. लोम्बार्ड नागपुर इंन्शुरन्स कंपनीची मो.सा गुन्हयात खोटी दाखवुन नुकसान भरपाई मिळवण्याकामी फसवणुक करुन बनावट दस्तऐवज तयार करुन फसवणुक केली आहे. त्यामुळे नामदेव धोंडबाजी टिपले रा.पारडी ता.कारंजा (घा) जि.वर्धा, प्रदिप भाऊराव हिरुडकर रा.आमणेर ता.वरुड जि.अमरावती, भुषण नामदेव टिपले यांचे विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक निशिकांत मेश्राम करीत आहेत.