Crime

स्वस्त सोने देण्याच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा ; सांगलीतील सात जणांविरोधात गुन्हा दाखल

स्वस्त सोने देण्याच्या आमिषाने २५ लाखांचा गंडा ; सांगलीतील सात जणांविरोधात गुन्हा दाखल

जळगाव (प्रतिनिधी) – स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून जळगावमधील एका शेअर दलालाची तब्बल २५ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सांगली जिल्ह्यातील लिंगनूर (ता. मिरज) येथे घडलेल्या या प्रकरणी सराईत गुन्हेगार लक्ष्मण नाईकसह सात जणांविरोधात मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यश दिलीप रडे (वय २४, रा. लक्ष्मीनगर, जळगाव, सध्या रा. पुणे) हे शेअर दलाल असून, त्यांचा संपर्क लक्ष्मण नाईक (रा. लिंगनूर) याच्याशी झाला. नाईक याने यश रडे यांना स्वस्तात सोने मिळेल असे आमिष दाखवून लिंगनूर येथे बोलावले. तेथे पोहोचल्यावर सध्या सोने उपलब्ध नसल्याचे सांगून काही दिवसांनी पुन्हा बोलावले. मार्च महिन्यात नाईक याने सोने आले असल्याचे सांगत यश रडे यांना २५ लाख रुपये घेऊन यायला सांगितले.

यश रडे हे नमूद रक्कम घेऊन पुन्हा लिंगनूर येथे गेले. तेथे शेतात सोने दाखवले जात असतानाच पोलिसांच्या वेशातील दोन अनोळखी व्यक्ती तिथे दाखल झाल्या. त्यानंतर सर्वजण तेथून पळून गेले. लक्ष्मण नाईक याने रक्कम पोलिसांनी घेतल्याचे सांगून ती परत मिळवून देण्याचे आश्वासन देत रडेंना गावी परत पाठवले.

त्यानंतर महिनाभर रडे यांनी रक्कम मिळवण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, नाईक टाळाटाळ करू लागल्याने आपली फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. अखेर त्यांनी मिरज ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

या प्रकरणी लक्ष्मण नाईक, प्रेम, राजेश, शिवा, एक कानडी भाषा बोलणारा व्यक्ती आणि पोलिसांच्या वेशात आलेले दोन अनोळखी असे एकूण सात जणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लक्ष्मण नाईक हा यापूर्वी बनावट नोटा प्रकरणात अटक होऊन जामिनावर असून त्याच्यावर चोरी, मारहाण आदी गुन्हे देखील दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाचा तपास मिरज ग्रामीण पोलिस करीत आहेत.

Chetan Wani

पत्रकारिता क्षेत्रात गत १५ वर्षांपासून कार्यरत. क्राईम रिपोर्टींगचा १२ वर्षांचा प्रदीर्घ अनुभव. राजकारण, महापालिका, उद्योग जगतातील विशेष लेखन. मंत्रालय, माहिती व जनसंपर्क विभागातील पत्रकारितेचा अनुभव. लोकसभा, विधानसभा, मनपा निवडणूक काळात मीडिया मॅनेजमेंट. मोबाईल नंबर : 9823333119

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button