
महा पोलीस न्यूज । दि.७ सप्टेंबर २०२५ । गणेश विसर्जन मिरवणुकीत मीडिया प्रतिनिधीवर एलसीबीच्या पोलीस उपनिरीक्षकाने (PSI) अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करीत मोबाईल हिसकावल्याची संतापजनक घटना दि.६ सप्टेंबर रोजी अमळनेर येथे घडली आहे. नुकतेच स्थानिक गुन्हे शाखेत (LCB) बदली झालेले उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी महा पोलीस न्यूजचे अमळनेर प्रतिनिधी अमानुष आणि गुंडगिरीच्या थाटात वर्तन केले.
महा पोलीस न्यूजचे अमळनेर प्रतिनिधी हे दि.६ सप्टेंबर रोजी गणेश विसर्जन मिरवणुकीत आपल्या पत्रकारितेचे कर्तव्य बजावत असताना पोलीस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांनी त्यांना शिवीगाळ केली. ते एवढ्यावरच थांबले नाही तर त्यांनी पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतला. ओळखपत्र गळ्यात असूनही माध्यम व चॅनलला उघडपणे शिवीगाळ करून वल्टे यांनी पोलीस वर्दीला कलंक लावला आहे.
पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार
या घटनेबाबत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांना संपादक यांनी व्हॉट्स ॲपद्वारे लेखी तक्रार केली आहे. याप्रकरणी पोलीस अधीक्षकांनी त्वरित कठोर कारवाई करावी, अन्यथा रस्त्यावर उतरून आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा पत्रकार संघटनांनी दिला आहे.
पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर
पत्रकारांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, पोलीस प्रशासनातील दादागिरीखोर अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही तर पत्रकार संघटना आंदोलन करणार हे निश्चित झाले आहे. अंगात खाकी परिधान न करता एलसीबीच्या नावे दादागिरी करणाऱ्या अशा पोलीस अधिकाऱ्यांचे वर्तन पोलीसदलाला शोभणारे नाही. अगोदरच वादाच्या भोवऱ्यात आणि टीकेचे धनी असलेल्या पोलीस दलाची प्रतिमा अशा अधिकाऱ्यांमुळे अधिक मलीन होत आहे.






