आखाजीच्या अगोदरच कासोदा पोलिसांनी उधळला जुगार अड्डा, राजकीय हस्तक्षेप झुगारत कारवाई
महा पोलीस न्यूज | १ मे २०२४ | आखाजी सणाची चाहूल लागण्यापूर्वी आणि महाराष्ट्र दिनाच्या दोन दिवस अगोदर कासोदा पोलिसांनी ताडे येथे सार्वजनिक गावठाण जागेवर सुरू असलेला जुगार अड्डा उधळला. सपोनि निलेश राजपूत यांच्या पथकाने दि.२८ व २९ एप्रिलच्या मध्यरात्री १ वाजता धाड टाकली असता नऊ जुगारीविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, कासोदा पोलीस स्टेशन हद्दीतील ताडे या गावाजवळ गावठाण जागेवर काही दिवसापासून पत्त्यांचा क्लब सुरू असून झन्ना मन्ना नावाचा जुगार खेळवला जात असल्याची गुप्त माहिती कासोदा पोलीस ठाण्याचे प्रभारी सहाय्यक निरीक्षक निलेश राजपूत यांना मिळाली होती. जिल्हा पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांच्या आदेशानव्ये व उपविभागीय पोलीस अधिकारी अभयसिंह देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दि.२८ रोजी रात्री पथकाने तयारी केली.
मध्यरात्री १ वाजता केली कारवाई
सपोनि निलेश राजपूत यांनी दि.२९ रोजी मध्यरात्री नंतर १ वाजता पो.हे.कॉ.राकेश खोंडे, पो.कॉ.योगेश पाटील, नितीन पाटील, जितेश पाटील, इमरान पठाण यांच्या पथकासह ताडे गावात छापा टाकला.कारवाईत पत्ते खेळताना आकाश सुदाम जैस्वाल ३० वर्ष, रविंद्र भगवान पाटिल ४१ वर्ष, मधुकर दिलीप पाटील ३४, ज्ञानेश्वर भरत पाटील ३० वर्ष, भगवान वसंत पाटील २५ वर्ष, रवींद्र विश्राम पाटील ४५ वर्ष, सर्व रा.ताडे, ता.एरंडोल तर प्रदीप ज्ञानेश्वर पाटील २१ वर्ष, रा.पिंप्रीसिम, ता.एरंडोल, आणि प्रदीप जनार्दन पाटील ३५ वर्ष रा.ब्राह्मणे ता.एरंडोल आणि यामधील एक इसम पोलिसांची चाहूल लागताच पळून गेला.
४ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल जप्त
सर्व गैरकायदा पत्ता जुगारावर पैसे लाऊन जुगार खेळताना मुद्देमालासह आढळून आले असून त्यांच्या अंगझडतीत रोकड, मोबाईल फोन व ९ मोटरसायकल मिळून आल्या. पोलिसांनी एकूण ४ लाख ३२ हजार ५२० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून पो.कॉ.योगेश पाटील यांच्या फिर्यादवरून संबंधितांवर कासोदा पो.स्टे.मध्ये. नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजकीय हस्तक्षेप झुगारला
जुगार खेळत असलेल्यांची रोकड व काही मुद्देमाल जमा केल्यावर आरोपी यांना गाडीमध्ये बसवत असतांना काहींनी या संबंधी कार्यवाही करू नये यासाठी सपोनि निलेश राजपूत यांना उशिरापर्यंत विनवण्या केल्या. तसेच यावेळी राजकीय हस्तक्षेप सुद्धा करण्यात आला परंतु निलेश राजपूत यांनी कुठल्याही दबावाला न घाबरता सरळ हाताने मुद्देमाल हस्तगत करत कार्यवाही केली. निलेश राजपूत यांच्या या बेधडक कार्यवाहीचे सर्व स्तरावरुन कौतूक होत आहे.