माजी आमदार साहेबराव पाटलांच्या घरात धाडसी चोरी; २४ लाखांचे सोने आणि १० लाखांची रोकड लंपास

माजी आमदार साहेबराव पाटलांच्या घरात धाडसी चोरी; २४ लाखांचे सोने आणि १० लाखांची रोकड लंपास
पारोळा (प्रतिनिधी): पारोळा तालुक्यात राजवड येथील माजी आमदार साहेबराव पाटील यांच्या बंद बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी २४ लाख रुपयांचे सोने आणि १० लाख रुपये रोख असा एकूण ३४ लाख ८ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. ही घटना २ ऑगस्ट रोजी पहाटे २ ते ४ च्या दरम्यान घडली. साहेबराव पाटील कुटुंबीयांसह नाशिक येथे गेले असताना चोरट्यांनी संधी साधली.
सकाळी घरामागील अरुण पाटील यांनी घराचे कुलूप तुटल्याची माहिती दिली. त्यानंतर नातेवाईकांनी पाहणी केली असता कपाटातील सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले. त्यांनी तातडीने साहेबराव पाटील यांच्याशी संपर्क साधला. माहिती मिळताच डीवायएसपी विनायक कोते, पोलीस निरीक्षक सचिन सानप यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी पोहोचले.
चोरट्यांनी घरातील कपाटातून ९ लाख रुपयांची ३०० ग्रॅमची मंगल पोत, ७ लाखांच्या २०० ग्रॅम सोन्याच्या अंगठ्या, ८ लाखांचे २०० ग्रॅमचे नेकलेस आणि १० लाख रुपये रोख रक्कम चोरून नेली. याशिवाय, ८ हजार रुपयांचा डीव्हीआर (DVR) सुद्धा चोरट्यांनी पळवला.
एका सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या फुटेजमध्ये चार चोरटे कंपाउंडची भिंत ओलांडून घरात प्रवेश करताना दिसत आहेत. पहाटे २ वाजून ३९ मिनिटांनी घरात शिरलेले चोरटे ३ वाजून १४ मिनिटांनी म्हणजेच अवघ्या ३५ मिनिटांत चोरी करून बाहेर पडले.
याप्रकरणी निलेश उर्फ बाळा अशोक पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.घटनास्थळी डीवायएसपी विनायक कोते, एलसीबीचे निरीक्षक संदीप पाटील, पोलीस निरीक्षक सचिन सानप, पीएसआय जितेंद्र वलटे, एपीआय योगेश महाजन, हेडकॉन्स्टेबल कैलास साळुंखे यांनी भेट देऊन पंचनामा केला. श्वान पथक, फॉरेन्सिक तज्ज्ञ आणि ठसे तज्ज्ञांच्या साहाय्याने तपास सुरू करण्यात आला असून, चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे.