गिरीश महाजन यांनी घेतली कॅबिनेट मंत्रीपदाची शपथ
जामनेरसह जिल्ह्यात भाजप कार्यकर्त्यांनी केला जल्लोष
जळगाव प्रतिनिधी-भाजपचे संकटमोचक मंत्री म्हणून ओळखले जाणारे गिरीश भाऊ महाजन यांनी पुन्हा एकदा मंत्रीपदाची शपथ घेतली असून त्यांच्याकडे महत्त्वाच्या खात्याची जबाबदारी सोपवली जाईल असे सूत्रांनी सांगितले. दरम्यान गिरीश महाजन यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर जामनेर तालुक्यासह जिल्ह्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष साजरा केला.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय समजले जाणारे गिरीश महाजन यांनी आज नागपूर येथील राजभवन येथे शपथ घेतली. त्यांना राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांनी पद आणि गोपनीयातेची शपथ दिली. महायुती सरकारमध्ये याआधी गिरीश महाजन यांच्याकडे जलसंपदा मंत्री नाशिकचे पालकमंत्री आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री सारखे महत्त्वाचे खाते मिळाले होते. आता त्यांच्याकडे कोणते खाते देण्यात येईल हे अद्याप स्पष्ट झाले नसले तरी त्यांच्याकडे महत्त्वाचे खाते येण्याची शक्यता सूत्रांनी वर्तवली आहे.