Social

२१ ग्रॅम सोन्याची चैन व मोबाईल केला सुपूर्द; शाहीन शेख हमीद यांनी जपली माणुसकी!

सोन्यापेक्षा मोलाची माणुसकी; भडगाव पोलिसांकडून सत्कार 

भडगाव – प्रतिनिधी: आजच्या युगात स्वार्थ, फसवणूक आणि अनैतिकतेच्या घटनांची संख्या वाढत असताना भडगाव येथे घडलेल्या एका घटनेने समाजाला आशेचा किरण दाखवला आहे. हरवलेली मौल्यवान वस्तू परत मिळणे जवळपास अशक्य वाटत असताना भडगाव बसस्थानक परिसरात प्रामाणिकपणाचा आणि माणुसकीचा अनोखा आदर्श निर्माण झाला आहे.

भडगाव बसस्थानकावर प्रवाशांची वर्दळ सुरू असताना शाहीन शेख हमीद यांना २१ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व एक मोबाईल फोन सापडला. सोन्याची चैन व मोबाईल ही अत्यंत मौल्यवान मालमत्ता असूनही त्यांनी क्षणाचाही मोह न धरता त्या वस्तू स्वतःकडे न ठेवता थेट भडगाव पोलीस स्टेशन येथे जाऊन जमा केल्या. त्यांच्या या कृतीने प्रामाणिकपणा अजूनही समाजात जिवंत असल्याचे सिद्ध झाले आहे.

या घटनेचे प्रकाश रामचंद्र मालपुरे हे प्रत्यक्ष साक्षीदार असून, चौकशीदरम्यान सदर सोन्याची चैन व मोबाईल हे सुमन उत्तम मालपुरे (वय ७०, रा. पुणे) यांच्या मालकीचे असल्याचे स्पष्ट झाले. वयोवृद्ध महिलेची ही मौल्यवान मालमत्ता हरवल्याने त्या मानसिक तणावात होत्या.

सापडलेली सोन्याची चैन व मोबाईल भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश शर्मा,सहाय्यक फौजदार भरत लिंगायत यांच्याकडे पंचनामा करून सुपूर्द करण्यात आली. यावेळी पोलीस निरीक्षक महेश शर्मा,सहाय्यक फौजदार भरत लिंगायत यांनी शाहीन शेख हमीद यांच्या प्रामाणिक आणि समाजोपयोगी कृतीचे विशेष कौतुक करत त्यांचे आभार मानले. अशा नागरिकांमुळे समाजावरचा विश्वास टिकून असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

पोलीस प्रशासनाकडून आवश्यक तपास व खातरजमा सुरू करून, लवकरच सदर वस्तू त्यांच्या मालकाकडे परत करण्यात येणार आहेत.

या घटनेमुळे भडगाव शहरात सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, नागरिकांकडून शाहीन शेख हमीद यांच्या प्रामाणिकपणाचे मुक्तकंठाने कौतुक केले जात आहे. अशा घटना समाजाला योग्य दिशा देणाऱ्या असून, तरुण पिढीसमोर एक आदर्श उभा करणाऱ्या ठरत आहेत.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button