
जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशन तर्फे मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर
जळगांव प्रतिनिधी जळगाव ग्रामीण मतदार संघातील शामखेडा येथे शिवसेना शाखेच्या माध्यमातून जीपीएस परिवार व मुक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विशेष आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. हे शिबिर युवा नेतृत्व व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले.*
या शिबिरात हृदयरोग, रक्तदाब, मधुमेह, ऑक्सिजन पातळी तपासणी, जनरल तपासणी तसेच मोतीबिंदू तपासणी आदी सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या. गावातील तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तपासणी, मार्गदर्शन व औषधोपचाराचा लाभ घेतला.
शिबिरात तपासणी झालेल्या अनेक रुग्णांच्या मोतीबिंदू शस्त्रक्रिया नुकत्याच जिल्हा सामान्य रुग्णालय, जळगाव येथील नेत्र विभागात नेत्रतज्ञ डॉ. प्रवीण पाटील यांनी यशस्वीरित्या केल्या. शस्त्रक्रियेनंतर आज संबंधित रुग्णांना चष्मे व औषधांचे वाटप करून त्यांना सुटी देण्यात आली.
यावेळी शस्त्रक्रिया झालेल्या ज्येष्ठ नागरिकांनी महाराष्ट्राचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा पालकमंत्री गुलाबराव पाटील तसेच युवा नेतृत्व प्रतापराव पाटील यांच्या समाजाभिमुख उपक्रमांचे मनापासून कौतुक केले.
या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी मुक्ती फाउंडेशनचे मुकुंद गोसावी, शामखेडा शिवसेना शाखा प्रमुख गणेश भिगाने, पदाधिकारी, शिवसैनिक, ग्रामस्थ यांचे मोलाचे सहकार्य लाभले. तसेच नेत्र चिकित्सा अधिकारी तुषार जोशी, दिलीप कुमावत व आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनीही सक्रिय सहभाग नोंदविला.
या उपक्रमामुळे परिसरातील गरजू रुग्णांना वेळेवर उपचार मिळाल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.






