सुकळी येथील सरपंच पदाची माळ शिक्षकाच्या गळ्यात;उपसरपंचपदी नितीन पाटील!

सुभाष धाडे : 22 जाने मुक्ताईनगर तालुक्यातील मौजे सुकळी येथील रिक्त असलेल्या सरपंच पदाची माळ शिक्षकांच्या गळ्यात तर उपसरपंच पदासाठी नितीन पाटील यांची वर्मी लागली.जिल्हाधिकारी यांचे आदेशान्वे काल दि 21 रोजी झालेल्या सरपंच (अनुसूचित प्रवर्गातील आरक्षित ) निवडीतून संदीप साया पावरा यांची सरपंच पदी निवड करण्यात आली तर उपसरपंचपदी नितीन नाना पाटील यांची निवड झाली. पिठासीन अधिकारी व्ही आर उगले, ग्रामपंचायत अधिकारी गोविंद राठोड व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत निवडीची प्रक्रिया ग्रामपंचायत कार्यालयात पोलीस बंदोबस्तात पार पडली.
सुकळी येथे चालू पंचवार्षिक मध्ये सरपंच पद हे एस टी महिला प्रवर्गासाठी आरक्षित होते. सुरुवातीला मीना सुधाकर कोळी यांनी काही काळापर्यंत पदभार सांभाळला होता. दरम्यान जात प्रमाणपत्र वेळेत सादर न केल्याने तसेच जात पडताळणीत त्यांना पदावरून पाय उतार व्हावे लागले. यानंतर या प्रवर्गातून उमेदवार नसल्याने प्रशासक भागवत महाजन यांचेकडे सूत्र सोपविण्यात आले. पंचवार्षिक कार्यकाळ जेमतेम महिना उरलेला असला तरी मात्र नुकत्याच मिळालेल्या जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वे काल दि 21 रोजी निवडीची प्रक्रिया पार पडली. सरपंच पदासाठी पात्रता एस टी प्रवर्गातील महिला किवा पुरुष आरक्षित असल्याने या प्रवर्गातील एकमेव उमेदवार संदीप पावरा असल्याने सरपंच पदाची माळ आयती त्याच्या गळ्यात पडली. तसेच सदस्यामधून करण्यात आलेल्या निवडीतून 3-3 सदस्य मत आल्यानंतर शेवटी ईश्वर चिट्ठी तुन उपसरपंच पदी नितीन नाना पाटील यांची वर्मी लागली.
*निवडीपूर्वी उडाला गोंधळ*
दरम्यान निवड प्रकियेच्या सुरुवातीला काही काळ गोंधळ उडाला होता यामुळे तणावाचे वातावरण निर्माण झाले मात्र मुक्ताईनगर चे पोलीस निरीक्षक आशिष आळसूल यांनी घटनास्थळी भेट दिल्यानंतर शांततेत निवड प्रक्रिया पार पडली.






